

पिंपरी: माजी नगरसेवकांच्या पळवा-पळवीमुळे प्रभागाचे वातावरण पूर्णपणे बदलून गेले आहे. राष्ट्रवादी काँग््रेास व शिवसेनेच्या या प्रभागावर भाजपाने लक्ष केंद्रित केले असून, त्यासाठी इतर पक्षांतील माजी नगरसेवकांना सोबत घेतले आहे. उमेदवारांची अदला-बदल पाहता निवडणूक अधिक चुरशीची होणार असे चित्र आहे. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीचे जावेद शेख, वैशाली काळभोर, शिवसेनेचे प्रमोद कुटे व मीनल यादव हे निवडून आले होते. जावेद शेख यांचे कोरोना काळात निधन झाले.
वैशाली काळभोर, शिवसेनेतून आलेले प्रमोद कुटे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून आलेले विशाल काळभोर, भाजपातून आलेले गणेश लंगोटे, अरुणा लंगोटे हे राष्ट्रवादीकडून इच्छुक आहेत. भाजपात गेलेल्या मीनल यादव, त्यांच्यासह कैलास कुटे, राजू दुर्गे, तेजस्विनी दुर्गे, प्रसाद शेट्टी, उल्हास शेट्टी, शारदा बाबर, अमित बाबर, ऐश्वर्या बाबर आदी इच्छुक आहेत. तसेच, मारुती भापकर, ॲड. उर्मिला काळभोर, के. के. कांबळे, योगिता कांबळे, दत्ता देवतरासे, आदिती चावरिया, स्वाती देवतरासे, नीलेश कांबळे, विष्णू चावरिया आदी इच्छुक आहेत. दुसऱ्या पक्षातून उमेदवारांची आयात करीत राष्ट्रवादी काँग््रेास व भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. निष्ठांवतांना डावल्याने बंडखोरीचा फटका बसू शकतो. उमेदवार दुसरे चिन्ह घेऊन मतदारांसमोर गेल्यावर निवडणुकीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता लागली आहे.
प्रभागातील परिसर
चिंचवड स्टेशन, महावीर पार्क, मोहननगर, रामनगर, काळभोरनगर, ऐश्वर्यम सोसायटी, शुभश्री सोसायटी, जयगणेश व्हिजन, विवेकनगर, विठ्ठलवाडी, बजाज ऑटो कंपनी, दत्तवाडी, तुळजाईवस्ती आदी.
महापालिकेचे अद्ययावत आकुर्डी रुग्णालय
आकुर्डी येथे हभप प्रभाकर कुटे रुग्णालय झाले आहे. काही भागांत कॉंक्रीटचे रस्ते तयार करण्यात आले असून, डांबरीकण करण्यात आले आहे. आकुर्डीत नानासाहेब धर्माधिकारी उद्यान उभारण्यात आले आहे. अर्बन स्ट्रीट डिजाईनने पदपथ व सायकल ट्रॅक विकसित करण्यात आले आहेत. तसेच, चौकांचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. मोहनगर येथील जलतरण तलावाची दुरूस्ती करण्यात आली आहे.
प्रभागातील जागांचे आरक्षण
अ-ओबीसी
ब-सर्वसाधारण महिला
क-सर्वसाधारण महिला
ड-सर्वसाधारण
वीज वारंवार खंडितचा रहिवाशांना त्रास
झोपडपट्टी, हाऊसिंग सोसायट्या, बैठी घरे अशी संमिश्र वस्ती असलेल्या नागरिकांचा हा प्रभाग आहे. चिंचवड स्टेशन, काळभोरनगर, मोहननगर, दत्तनगर, रामनगर, पुणे-मुंबई जुना महामार्गाच्या पलिकडील आकुर्डीतील विठ्ठलवाडी व दत्तवाडी असा मोठा भाग प्रभागात येतो. आकुर्डीतील दत्तवाडी, विठ्ठलवाडी, मोहनगर, चिंचवड स्टेशन, रामनगर विवेकनगर, क्रांतीनगर परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित असल्याने रहिवासी वैतागले आहेत. विठ्ठलवाडी येथील पालखी तळाचे सुशोभिकरण रखडले आहे. काही भागांत पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दत्तवाडी, विठ्ठलवाडी, शिवदर्शन कॉलनी, शेलार चाळ, अंधशाळा परिसरात पावसाळ्यात पाणी घरामध्ये शिरते. मोहनगर येथील जिजामाता सभागृहाची दुरवस्था झाली आहे. रस्ते खोदण्यात येत असल्याने खड्डे व धुळीचा वाहनचालकांना त्रास्त होतो. मेट्रोच्या कामामुळे तसेच, अंतर्गत रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मोहननगर येथील राजर्षी शाहू महाराज जलतरण तलाव बंद असल्याने नागरिकांचा हिरमोड होत आहे. टेनिस कोर्टची दुरवस्था झाली आहे. पदपथ मोठे केल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे.