

जगन्नाथ काळे
तळेगाव स्टेशन: तळेगाव दाभाडे परिसरात सध्या कडक उन्ह पडत असल्यामुळे डोंगर, माळरानावरील चारा वाळून गेला आहे. पाऊस पडायला किमान दोन ते अडीच महिने असल्याने शेतकऱ्यांना चारा सुरक्षित ठेवताना कसरत करावी लागत आहे. तसेच, चारा अपुरा पडू नये, यासाठी कडवाळ (घास) लावताना शेतकरी दिसत आहेत.
यांत्रिकीकरणामुळे जनावरांची संख्या झाली कमी
ज्यांच्याकडे जनावरे आहेत ते शेतकरी जनावरांना चारा अपुरा पडू नये, यासाठी चारा सुरक्षित ठेवत आहेत. तसेच, त्याची निगा राखताना दिसत आहेत. वेळप्रसंगी कडबा, उसाचे वाढे आदी विकत घेत आहेत. परिसरात यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणात झाले असल्यामुळे जनावरांची संख्या कमी झाली आहे. तरी अनेकजण शेतीला पूरक व्यवसाय म्हणून गाय, म्हैस, शेळ्या पाळत आहेत. तसेच, ज्यांना जमीन कमी आहे त्यांना यांत्रीकीकरण परवडत नसल्यामुळे ते शेतीच्या कामासाठी जनावरे पाळतात. त्यामुळे पाऊस पडेपर्यंत चारा कमी पडू नये, यासाठी शेतकरी चारा सुरक्षित ठेवताना दिसत आहेत.
चारा ठेवला झाकून
अवकाळी पावसाने चारा भिजू नये, यासाठी प्लास्टिकच्या कागदाने अथवा ताडपत्रीने आवरण घालून चारा झाकला जात आहे. अनेकवेळा जनावरांना काही काम नसले तरी बळीराजा त्यांना उपाशी ठेवत नाही. ज्यांच्याकडे शेळ्या आहेत त्यांना अधिक कसरत करावी लागत आहे. शेळ्यांना इतर जनावरांसारखा कडबा चालत नाही. त्यांना झाडपाला द्यावा लागतो. यासाठी शेतकरर्ऱ्यांना वणवण फिरावे लागत आहे. तसेच, चारा सांभाळून ठेवताना त्यास आग लागू नये, याबाबत काळजी घ्यावी लागते. पाण्याची कमतरता असली तरी इतर उत्पन्न न घेता अनेक शेतकरी शेतात कडवाळ लावत आहेत.
मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे चारा भिजला आहे. त्यामुळे चाऱ्याची कमतरता भासण्याची शक्यता आहे.
मारुती थिटे, दुग्ध व्यावसायिक
अनेकजण जनावरे भाकड झाली की विकून टाकतात; परंतु आम्ही जनावरांचा सांभाळ करत आहोत. यांत्रिकीकरण झाले असले तरी जनावरे आमच्याकडे आहेत. त्यामुळे चाऱ्याची तरतूद करताना कसरत करावी लागत आहे.
सदाशिव गराडे, प्रगतशील शेतकरी
सध्या ग््राामीण भागात बिबट्यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्री-अपरात्री जनावरांची जीवितहानी होऊ नये, यासाठी फारच दक्ष रहावे लागते.
देवराम सावंत, शेतकरी