

संतोष महामुनी
नवी सांगवी : महापालिकेच्या बीआरटीएस अंतर्गत कासारवाडी येथील गंधर्व लॉन्ससमोर रस्त्याच्या कडेला मोकळ्या जागेत नव्याने रॉक गार्डन विकसित करण्यात आले. मात्र, या रॉक गार्डनमध्येच घुसखोरी करून चक्क जनावरे, शेळ्या मेंढ्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असल्याचे पहावयास मिळत आहे. मात्र, संबंधित प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
कासारवाडी येथील रॉक गार्डन हे हाकेच्या अंतरावर असणार्या ह क्षेत्रीय कार्यालयअंतर्गत असूनदेखील येथील क्षेत्रीय अधिकारी, उद्यान विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे येथील उद्यानाचा दिवसेंदिवस बकालपणा वाढत चालला आहे. आजही उद्यानात घुसखोरी करून कुणाचीही तमा न बाळगता उद्यानात पाळीव जनावरे, शेळ्या मेंढ्यांचा वावर बिनधास्तपणे होत आहे. त्यामुळे येथील उद्यानाला बाधा निर्माण होत आहे. (Latest Pimpri News)
उद्यानात डाव्या बाजूने प्रवेश करताच उद्यानाच्या प्रवेशद्वारावर एक वासरू बांधले आहे. तर उजव्या बाजूला मेंढपाळी दिवसाढवळ्या अंथरुण पांघरुण घेऊन झोपा काढत आहेत. जवळच शेळ्यामेंढ्या चरत आहेत. जनावरे, शेळ्या मेंढ्यांचे खाद्यपदार्थांची पोती आढळून येत आहेत. तर बेडशीट, चादरी, गोधड्या सुरक्षा भिंतीवर असणार्या लोखंडी जाळींवर टाकल्याने उद्यानाच्या बाहेरून मुख्य रस्त्यावरून ये-जा करीत असणार्या वाहनचालकांच्या हे दृश्य निदर्शनास पडत आहे.
खरे तर येथील रॉक गार्डनची थीम असून, येथील रॉक गार्डन ब्ल्यू लाईनमध्ये येत आहे. मात्र, याचा एक उद्देश असा आहे की उद्यानाला लागून नदी आहे. पूर आल्यास येथील उद्यानात पाणी आल्यास त्या पाण्याचे मोठ्या प्रमाणात निचरा होण्यास मदत मिळणार आहे. सदर उद्यान फेब्रुवारी 2021 मध्ये विकसित करण्यास सुरवात झाली.
त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये उद्यान विकसित झाले. यासाठी तब्बल एक कोटी 20 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. येथील उद्यान जवळपास दोन एकरांत विकसित करण्यात आले आहे. उद्यानात 25 देशी, विदेशी झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. या झाडांसभोवताली आकर्षक पद्धतीने दगडांचे आवरन करून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. उद्यानात एकूण 30 विद्युत पोल उभारण्यात आले आहेत.
गेली काही महिने उद्यान विकसित केले असूनही महापालिकेच्या उद्यान विभागाकडे बीआरटीएस विभागाकडून सुपूर्त न केल्याने येथील उद्यान बेवारसपणे पडले आहे. याकडे एकही अधिकारी फिरकत नसून, उद्यानाची दिवसेंदिवस दुरवस्था होत चालली आहे. उद्यानात पावसाळ्यामुळे मोठ्या प्रमाणात गवत, झाडेझुडपे वाढली आहेत.
जॉगिंग ट्रॅकवर जनावरे, शेळ्या मेंढ्या विष्ठा टाकत असल्याने मॉर्निंग वॉकसाठी येणार्या व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी येणार्या उद्यानप्रेमींची गैरसोय होत आहे. या उद्यानाची निगा व स्वच्छता न राखल्याने उद्यानात बकालपणा दिसून येत आहे.
सदर उद्यान मार्च 2024 मध्येच उद्यान विभागाला ताब्यात घेण्यासाठी पत्र दिलेले आहे. गार्डनमध्ये पाणी वापरासाठी एसटीपीचे पाण्याचे कनेक्शन दिलेले आहे. तरीदेखील काही त्रुटी असतील तर उद्यान विभागाच्या संबंधित अधिकारी यांच्याशी संपर्क करून माहिती घेते.
- संध्या वाघ, कार्यकारी अभियंता स्थापत्य विभाग