बारामती: धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्याच्या प्रश्नी सरकारकडून सुरू असलेल्या फसवणुकीच्या निषेधार्थ समाजाच्या वतीने बारामतीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर मंगळवारी (दि. 29) निषेध आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी समाजाचा विश्वासघात केल्याचा आरोप या वेळी धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केला.
आंदोलनात रामराव कोल्हे, गंगाराम मैद, संदीप चोपडे, कल्याणी वाघमोडे, सुजित वाघमोडे, जय्यप्पा खरात, तानाजी कटरे, अजितकुमार पाटील, सचिन गडदे, काकासाहेब बुरुंगले, अमोल सातकर आदी सहभागी झाले होते. (Latest Pune News)
राज्यात 2014 साली आरक्षणासाठी धनगर समाजाने मोठे आंदोलन केले. त्याचा बारामती हा केंद्रबिंदू होता. बेमुदत उपोषण सुरू असताना भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत येत आंदोलनकर्त्यांची भेट घेतली होती.
सरकार आल्यावर पहिल्याच कँबिनेटमध्ये एसटी आरक्षण देणार, अशी घोषणा त्यांनी केल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते. परंतु त्यानंतर मागील 12 वर्षांत आरक्षण प्रश्न सुटला नाही. 2014 ते 2019 फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना समाजाच्या तोंडाला पानेच पुसली. आता 2024 पासून ते पुन्हा मुख्यमंत्री झाले, तरी त्यांनी हा प्रश्न सोडवला नसल्याची टीका या वेळी ढोणे यांनी केली.
आरक्षण प्रश्नावर अंमलबजावणीच्या दृष्टीने कोणतीही ठोस कृती केली जात नाही. त्यामुळे या प्रश्नाकडे लक्ष वेधत ’जबाब दो’ आंदोलनाच्या माध्यमातून धनगर एसटी आरक्षणासाठी राज्य सरकारने तात्काळ मंत्री समितीची स्थापना करून केंद्र सरकारला शिफारस पाठविण्याची कार्यवाही करावी.
पंतप्रधानांनी धनगर समाजाला दिलेले आश्वासन पूर्णत्वास नेण्यासाठी केंद्र सरकारने समन्वय समिती स्थापन करून प्रक्रिया सुरू करावी, महाराष्ट्र सरकारने धनगर आरक्षणप्रश्नी श्वेतपत्रिका जाहीर करावी, आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या. प्रांताधिकारी कार्यालयाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.