

QR code for registered doctors
पुणे: राज्यात बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाईचा निर्णय घेत महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेने (महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल) नोंदणीकृत डॉक्टरांसाठी क्यूआर कोडचा वापर अनिवार्य केला आहे. यासाठी ‘नो युअर डॉक्टर’ या प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे नागरिकांना डॉक्टरांची खरी ओळख, पात्रता आणि परवान्याची माहिती मोबाईलवरच सहज मिळणार आहे.
राज्यातील वाढलेल्या बोगस डॉक्टरांच्या वाढत्या प्रमाणावर विधानसभेतील चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत 391 बोगस डॉक्टरांवर गुन्हे दाखल झाले असून, केवळ दोन आरोपींना शिक्षा झाली आहे, तर 17 जणांविरोधात आरोप सिद्ध झाले आहेत. कारवाई कठोर करण्यासाठी क्यूआर कोड प्रणाली तातडीने राबवली जाणार आहे. यासंबंधीचा आदेश दोन आठवड्यांत जारी केला जाईल. डॉक्टरांनी त्यांचे कोड असलेले कार्ड रुग्णालयांमध्ये प्रदर्शति करणे बंधनकारक केले जाणार आहे. (Latest Pune News)
एमएमसीने 11 फेब्रुवारी 2025 रोजी हे व्यासपीठ सुरू केले होते. याद्वारे नागरिक कोणताही डॉक्टर नोंदणीकृत आहे का, त्याची पात्रता आणि विशेष क्षेत्र कोणती आहेत, या बाबी कोड स्कॅन करून तपासू शकतात. राज्यात सध्या दोन लाख नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिक असूनही, केवळ 10,000 डॉक्टरांनीच या सिस्टीममध्ये नावनोंदणी केली होती. आतापर्यंत नोंदणी ऐच्छिक होती. आता ती अनिवार्य करण्यात आली आहे.
क्यूआर कोड अनिवार्य करण्याचा निर्णय अत्यंत गरजेचा होता. यामुळे बोगस डॉक्टरांना आळा बसेल. प्रामाणिक डॉक्टरांवर नागरिकांचा विश्वास बसेल. या निर्णयामुळे वैद्यकीय सरावासाठी सकारात्मक पाऊल उचलल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
- डॉ. सुनील इंगळे, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, पुणे