

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : गर्भपात केल्यानंतर प्रेयसीच्या मृतदेहासह तिच्या दोन चिमुरड्या मुलांना नदीमध्ये फेकून देण्यात आले. ही धक्कादायक घटना २२ जुलै रोजी तळेगाव दाभाडे येथे उघडकीस आली. या प्रकरणाची व्याप्ती आणि संवेदनशीलता लक्षात घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली आहे. तळेगाव ते उजनी धरण प्रवाह मार्गात मायलेकारांचे मृतदेह शोधणे ही एसआयटीची प्राथमिकता असणार आहे. (Talegaon triple murder case)
समरीन निसार नेवरेकर (वय २५) आणि ईशांत (वय ५), इजान (वय २) अशी शोध शोध सुरू असलेल्या माय लेकरांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गजेंद्र जगन्नाथ दगडखैर (३७, रा. समता कॉलनी, वराळे, मावळ), रविकांत भानुदास गायकवाड (४१, रा. डॉन बॉस्को कॉलनी, ईश्वरानंद सोसायटी, सावेडी, अहमदनगर), मध्यस्थी महिला उषा बुधवंत आणि गर्भपात करणारा डॉक्टर यांना अटक करण्यात आली आहे. (Talegaon triple murder case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गजेंद्र दगडखैर याने ६ जुलैरोजी समरीन नेवरेकर हिला गर्भपात करण्यासाठी मित्र रविकांत गायकवाड याच्यासोबत कळंबोली येथे पाठविले. दरम्यान, रुग्णालयात गर्भपात सुरू असताना समरीन हिचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपींनी आपसात संगनमत करून ९ जुलैरोजी समरीनचा मृतदेह आणि तिच्या दोन्ही लहान मुलांना तळेगाव येथील वराळे येथे आणले. इंद्रायणी नदीत फेकून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्लॅन त्यांचा ठरला. त्यानुसार, इंद्रायणी नदीत आरोपींनी समरीनचा मृतदेह फेकला. आईला फेकल्याचे पाहून दोन्ही मुले मोठमोठ्याने रडू लागली. त्यामुळे नराधम आरोपींनी दोन्ही मुलांना देखील जिवंतपणे नदीत फेकून दिले. (Talegaon triple murder case)
ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी दोन आरोपींना सुरुवातीला अटक केली. तसेच तिघा मायलेकरांचा इंद्रायणी नदीत शोध सुरु केला. इंद्रायणी नदी पुढे भीमा नदीत मिसळून उजनी धरणाकडे जाते. पोलिसांनी तळेगाव येथून उजनी धरणापर्यंत नदीकाठच्या सर्व पोलीस ठाण्यांना मृतदेह शोधण्याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, पोलिसांनी गर्भपात करणारा डॉक्टर आणि मध्यस्थी महिला या दोघांना देखील अटक केली आहे.
गुन्ह्याची व्याप्ती आणि गांभीर्य लक्षात घेत पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी एसआयटी स्थापन केली. पोलीस उपायुक्त बापू बांगर हे या तपासावर पर्यवेक्षण करणार आहेत. तर, देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे यांच्या निगराणीखाली एसआयटी काम करणार आहे. तिघांचे मृतदेह शोधणे हे एसआयटी समोरील आव्हान असणार आहे.
सहायक पोलीस आयुक्त देविदास घेवारे (तपास पथक प्रमुख)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर (तपास अधिकारी)
वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायन्नावार (तपास मदतनीस)
सहायक पोलीस निरीक्षक एस टी म्हस्के (तपास मदतनीस)
पोलीस हवालदार एस एम भवारी (तपास मदतनीस)