

निपाणी : पुढारी वृत्तसेवा
पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगा हद्दीत मांगुर फाटा येथे पूर्वेकडील बाजूस कुंभार शेताजवळ शेतवडीसह वेदगंगेच्या पुराचे बॅकवॉटर पाणी आले होते. महामार्गाला पर्याय असलेल्या सर्विस रोडवरही सुमारे २०० मीटर पाणी आले होते. त्यामुळे शुक्रवारी रात्रीपासून पोलीस व रस्ते बांधकाम औताडे कंपनीने एनएचएआय (नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया) च्या प्राधिकरणाच्या आदेशानुसार कंपनीने या टापूत २०० मीटर अंतरापर्यंत एका लेनद्वारे आंतरराज्य वाहतूक सुरू ठेवली होती. दरम्यान हे पाणी रविवारी रात्री पूर्णपणे ओसरल्याने आज (सोमवार) सकाळी या टापूत दोन्ही लेनद्वारे स्वतंत्ररित्या आंतरराज्य वाहतूक सुरू झाली आहे.
शुक्रवारी रात्री ९ पासुन पूर्वेकडील बाजूच्या पर्यायी सर्विस रोड मार्गावर पाणी होते. दरम्यान रविवारी मध्यरात्री पूर्णतः पाणी औसरले. दरम्यान सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या एनएच एआय (नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडिया) व रस्ते देखभाल औताडे कंपनीच्या अधिकाऱ्यासह पोलीस प्रशासनाने घटनास्थळी भेट देऊन रितसर मांगुर फाटा ते कुंभार शेताजवळील लहान भुयारी मार्गापर्यंत रस्त्याची तपासणी केली. यानंतर आज (सोमवार) सकाळी १० पासून कोल्हापूरहून बेळगावकडे होणारी वाहतूक स्वतंत्ररित्या सुरू करण्यात आली.
शुक्रवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत केवळ मांगुर फाटा ते कुंभार शेताजवळील लहान भुयारी मार्गापर्यंत एका लेनद्वारे दोन्ही बाजुची आंतरराज्य वाहतूक सुरू होती. त्यामुळे वाहतुकीला काहीसा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे या मार्गात संथगतीने वाहतूक सुरू होती.
शुक्रवारी अचानकपणे पाणी येऊन पूर्वेकडील वाहतूक रोखून धरीत ती पश्चिमेकडे वळविण्यात आली होती. यावेळी प्रत्यक्ष घटनास्थळी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया हुबळी विभागाचे अधिकारी तसेच रस्ते बांधकाम औताडे कंपनीचे अधिकारी यांच्यासह डीएसपी गोपाळकृष्ण गौडर, सीपीआय बी.एस.तळवार, उपनिरीक्षक शिवराज नाईकवाडी, रस्ते देखभाल कंपनीचे परिसर अभियंता विजय दाईंगडे, भरारी पथकाचे निरीक्षक संतराम माळगे, अक्षय सारापुरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
त्यानंतर शुक्रवारी रात्री ९ नंतर पूर्वेकडील वाहतूक बंद करून पश्चिमेकडील एका लेनद्वारे आंतरराज्य वाहतूक सुरू ठेवली होती. अखेर सोमवारी सकाळी १० वाजता नॅशनल हायवे ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पूर्वेकडील बाजूच्या रस्त्याच्या २०० मीटर अंतराचे पूर्णपणे तपासणी करून कोणत्या ठिकाणी रस्ता खचला आहे का? याची मशीनद्वारे चाचपणी केल्यानंतर वाहतूक सुरू करण्यास परवानगी दिली.
त्यामुळे सद्यस्थितीत आता सौंदलगा मांगुर फाटा टापुत दोन्ही बाजूने विनाअडथळा बिनधास्त आंतरराज्य वाहतूक सुरू असल्याने वाहनधारकांसह नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया (एचएआय) कडून मांगुर फाटा ते कुंभार शेताजवळील भुयारी मार्गावर सुमारे २०० मीटर अंतरापर्यंत पाणी आल्याने पूर्वेकडील पर्यायी सर्विस रस्ता महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. दरम्यान सलग ५८ तास पूर्वेकडील वाहतूक बंद राहिल्याने पाणी ओसरल्यानंतर सोमवारी सकाळी ९ वाजता नॅशनल हायवे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी केली. त्यानुसार वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा धोका नाही हे पूर्णपणे स्पष्ट झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवली आहे.
बी.एस.तळवार
सीपीआय, निपाणी