

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी कामाला लागा, लोकांमध्ये जा. थेट जनतेशी संवाद साधा. त्यांचे प्रश्न मांडा. आक्रमक भूमिका घ्या, आंदोलन करा, अशा सूचना करत प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे आपल्या कृतीतून दाखवून द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले.(Latest Pimpari chinchwad News)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दोन दिवस पिंपरी-चिंचवड शहराचा दौरा केला. शहरातील अनेक भागांत जाऊन त्यांनी नागरिकांशी संवाद केला. तसेच, माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांशी हितगुज केली. त्यानंतर तातडीने शरदचंद्र पवार पक्षाने बैठक घेत, पदाधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारीबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड शहरातील पक्ष पदाधिऱ्यांची तब्बल अडीच तास आढावा बैठक मंगळवार (दि.23) पवार यांच्या अध्यक्षतेखाली कासारवाडी येथील एका हॉटेलमध्ये झाली. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, पिंपरी-चिंचवड शहराचे प्रभारी तथा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष तुषार कामठे, माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे, प्रकाश म्हस्के, माजी नगरसेवक व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा निवडणुकीत पक्षाला चांगली मते मिळाली होती. तब्बल साडेचार लाख मते मिळाली. जनमत आपल्या बाजूने आहे. पक्षाला नागरिकांचा प्रतिसाद आहे. महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने नागरिकांशी संवाद साधा. त्यांचे प्रश्न मांडा. शहरात होणाऱ्या चुकीच्या कामांवर लक्ष ठेवायला हवे. नोकरदार, कामगार, आयटीयन्स, महिला, युवक यांच्या प्रश्नांसाठी जोरदार, परखड व आक्रमक भूमिका घ्या. पक्ष संघटन बळकट करा, असा सूचना पवार यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या. निष्ठावंत, सर्वसामान्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निवडणुकीत संधी दिली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढण्याचे संकेत
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक महाविकास आघाडीतूनच लढण्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत. निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी समन्वय साधण्यासाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. या समितीद्वारे महाविकास आघाडीची बैठक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शहराध्यक्ष बदलण्याचा मुद्दा बाजूला ?
पक्षात चैतन्य आणण्यासाठी माजी महापौर व ज्येष्ठ नेते आझम पानसरे यांना पक्षाचे शहराध्यपद देण्याची मागणी बैठकीत करण्यात आली. तसेच, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष बदलण्यात येऊ नये, अशी बाजू काही पदाधिकाऱ्यांनी मांडली. शरद पवार यांनी दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर आझम पानसरे यांना विश्वासात घेऊनच तुषार कामठे यांनी काम करावे. अगोदर शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवा. प्रमुख विरोधी पक्ष असल्याचे आक्रमक आंदोलनातून दाखवून द्या. त्यानंतर वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्याबाबत विचार करू, ते असे म्हणाले.
पुढील महिन्यात आंदोलन करणार
महापालिकेशी संबंधित प्रश्नांवर पक्षाचे पदाधिकारी आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना 1 ऑक्टोबरला भेटणार आहेत. त्यानंतर दहा दिवसात नागरी प्रश्नांवर महापालिकेवर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे, असे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले.
विकास केला म्हणता, मग इतक्या तक्रारी कशा ?
पिंपरी-चिंचवड शहराचा विकास मी केला, असे ते म्हणतात; मात्र त्याच शहरातून तब्बल 4 हजार 800 लोकांच्या तक्रारी एका जनसंवादात त्यांच्यासमोर येतात. मग, विकास कोठे गेला. खरंच विकास झाला का? ही निव्वळ शहरवासीयांची दिशाभूल आहे, अशी टीका शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता केली. कासारवाडी येथे झालेल्या पक्षाच्या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना अध्यक्ष शरद पवार. समवेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, शहराध्यक्ष तुषार कामठे, ज्येष्ठ नेते आझम पानसरे, प्रकाश म्हस्के आदी मान्यवर.