

देहूगाव: तळेगाव ते उरुळी कांचनदरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्गाचा डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तयार करण्यात आला असून, या मार्गामुळे होणाऱ्या जमिनीच्या संपादनाला स्थानिक शेतकऱ्यांचा तीव विरोध सुरू झाला आहे. सदर प्रकल्पामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीमुळे रेल्वे मार्ग त्वरित रद्द करण्याची मागणी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हा प्रस्तावित रेल्वे मार्ग तळेगाव, झेंडेमळा, बोडकेवाडी, सांगुर्डी, किन्हई, हगवणे मळा, काळोखे मळा, तळवडे, निघोजे मार्गे कुरुळी व उरुळी कांचन येथे जातो. या सर्व गावांमधील शेतकरी या मार्गामुळे बाधित होणार असून, त्यांच्या जमिनी, घरे, वडिलोपार्जित व्यवसाय आणि पर्यावरण यावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे. (Latest Pimpari chinchwad News)
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांच्याशी कोणताही थेट संवाद न साधता प्रकल्प ठरवले जात आहेत. जे निषेधार्ह आहे. त्यामुळे हा प्रकल्प रद्द करून पर्यायी मार्ग शोधण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
आधीच शेतकरी भूमिहीन
स्थानिक शेतकरी वारकरी संप्रदायाशी संबंधित असून, यापूर्वीच संरक्षण खात्याने अनेक शेतजमिनी ताब्यात घेतल्यामुळे अनेकजण भूमिहीन झाले आहेत. काही शेतकरी अजूनही भाडेपट्टीने शेती करत आहेत. तर काहींच्या जमिनी रिकाम्या पडून आहेत. रेल्वे मार्गासाठी आणखी जमिनी घेतल्यास संपूर्ण भागातील शेती व्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण झाला आहे.
संघटित विरोध, आंदोलनाचा इशारा
या पार्श्वभूमीवर नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यात ॲड. प्रवीण झेंडे, सुनील हगवणे, वसंत भसे, माऊली झेंडे, बाजीराव भालेकर, गणेश बोडके, संतोष काळोखे, अमोल झेंडे तसेच झेंडेमळा, बोडकेवाडी, सांगूर्डी, हगवणे मळा, काळोखे मळा या गावांतील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत प्रस्तावित रेल्वे मार्ग त्वरित रद्द न केल्यास तीव आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांनी उपोषण, रास्ता रोको आणि विविध आंदोलनात्मक मार्गांनी आपला विरोध नोंदवण्याचा ठाम निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.
शेतकऱ्यांचे म्हणणे...
कुटुंबांचे विस्थापन होणार
वडिलोपार्जित शेती व मालमत्तेचे नुकसान होणार
नैसर्गिक जलस्रोत व पर्यावरणाचा ऱ्हास
मंदिर, शाळा व सार्वजनिक सुविधा बाधित होणार
गॅसलाईनसाठी पूर्वी संपादित केलेल्या जमिनींचा मोबदला अद्याप मिळालेला नाही