पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध संघाचा सुमारे 100 कोटी रुपयांचा डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक दूध प्रकल्प मुख्यालयातील उपलब्ध जागेवर साकारण्याचे संचालक मंडळाने निश्चित केल्याची माहिती संघाचे अध्यक्ष ॲड. स्वप्निल ढमढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. सध्या प्रतिदिन दीड लाख लिटर इतके होणारे दूधसंकलन वाढून सुमारे तीन लाख लिटरपर्यंत नेण्याचा संघाचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. (Latest Pune News)
संघाच्या कामकाजाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेला ढमढेरे यांच्यासह उपाध्यक्ष मारुती जगताप, ज्येष्ठ संचालक गोपाळराव म्हस्के, विष्णू हिंगे, बाळासाहेब खिलारी, केशर पवार, राहुल दिवेकर, भाऊ देवाडे, अरुण चांभारे, कालिदास गोपाळघरे, लता गोपाळे, निखिल तांबे आणि व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये आदी उपस्थित होते.
संघाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत यापूर्वीच आम्ही राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) अर्थसाहाय्यातून व त्यांच्या माध्यमातून डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक प्रकल्पाचा आराखडा तयार करून त्याला मान्यता दिली होती. मात्र, संघाच्या मुख्यालयातील जमिनीवर महापालिकेचे बहूद्देशीय कामांसाठीचे असलेल्या
आरक्षणामुळे अडचण होती. आता संबंधित आरक्षणही रद्द झाल्याने आणि शहराच्या वाढत्या दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी डेअरी विस्तारीकरण प्रकल्पावर संचालक मंडळाने लक्ष केंद्रित केले आहे. आगामी दीड वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचे आणि त्यापुढील सहा महिन्यांत तो कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. तोपर्यंत जुन्या प्रकल्पाद्वारे काम सुरूच राहील आणि सणासुदीला वाढणाऱ्या मागणीवेळी दोन्ही प्रकल्पांचा उपयोग करण्याचे आम्ही निश्चित केल्याचेही ढमढेरे यांनी सांगितले.
कात्रज संघाचा सध्याचा दूध प्रकल्प हा साठ वर्षांपूर्वीचा आहे. नवीन तंत्रज्ञान आल्याने प्रकल्पात बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या दूध, दही, ताक, तूप आणि इतर उपपदार्थांची मागणी पूर्ण करण्यात काही अडचणी येतात. शिवाय, अन्य दूध प्रकल्पांकडून पॅकिंग सुविधा येथे उपलब्धीची मागणी असताना क्षमता अपुरी पडत असल्याने हे कामसुद्धा संघाला घेता येत नाही. मात्र, अत्याधुनिक प्रकल्पामुळे संघाची क्षमतावाढ होऊन त्याचा फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांना निश्चित मिळण्याची अपेक्षा आहे.
संघाला गतवर्षी 2.60 कोटींचा निव्वळ नफा
संघाच्या सर्व संचालकांनी दूध उत्पादक शेतकरी केंद्रबिंदू मानून काम करीत गतवर्ष 2024-25 मध्ये सुमारे 381 कोटी रुपयांची उलाढाल पूर्ण केलेली आहे. त्यातून संघाला 2.60 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. दुधाच्या अत्याधुनिक प्रकल्पासाठी लागणाऱ्या कर्जापैकी 80 टक्के कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, तर 20 टक्के रक्कम स्वनिधी म्हणून कात्रज संघ गुंतवणूक करणार असल्याची माहिती संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये यांनी दिली.