

पिंपरी: पिंपरी-चिंचवड अप्पर तहसीलदार कार्यालय स्वतंत्र झाल्यानंतर आता पूर्वीच्या पिंपरी-चिंचवडमधून (हवेली) लोणीकंद आणि हवेली गावाला वगळण्यात आले आहे. त्यामुळे आता शासनाचे वेगवेगळे संकेतस्थळ आणि दाखल्यांवर पिंपरी चिंचवड स्वतंत्र दिसू लागले आहे. परिणामी, अर्जदारांचा होणारा गोंधळ आणि तहसील कार्यालयाच्या बाहेरच्या हद्दीतील येणार्या दाखल्यांची संख्या कमी होणार आहे. त्यामुळे कार्यालयावरचा अतिरिक्त ताण कमी होणार आहे.
दाखल्यांचा ताण होणार कमी
पिंपरी-चिंचवड तहसीलदारअंतर्गत जवळपास 30 गावे आहेत. त्यामध्ये शहराबरोबर माळीनगर, विठ्ठलनगर, देहुगाव, चिंचोली, किन्हई, बोपखेल मामुर्डी या गावांचादेखील समावेश होतो.. यापूर्वी हवेलीअंतर्गत या गावाच्या बाहेरूनदेखील अर्ज येत होते. त्यानंतर संबंधित अर्ज पुन्हा त्या त्या विभागाकडे पाठवावे लागत होते. त्यामुळे दाखल्यांचा ताण आणि हे स्वतंत्र काम करावे लागत होते. मात्र आता तो ताण कमी होणार आहे. (Latest Pimpri News)
13 प्रकारांचे देण्यात येतात दाखले
नागरिकांना शालेय, वैद्यकीय अथवा वेगवेगळ्या योजनांसाठी दाखल्यांची आवश्यकता असते. जवळपास तेरा दाखले तहसील कार्यालयाकडून देण्यात येतात. ऑनलाइन अर्ज भरताना अनेकदा नागरिकांकडून हवेली म्हणून उल्लेख केला जातो. मात्र, संबंधित अर्ज हा पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाच्या बाहेरचा असतो.
त्यामुळे तो अर्ज तसाच पडून राहतो. त्यावरती संबंधित कार्यालय अथवा पिंपरी-चिंचवडकडूनदेखील कार्यवाही होत नाही. त्यामुळे नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. तसेच, प्राप्त झालेल्या अर्जांमधून नेमके पिंपरी चिंचवड संबंधित अर्ज कोणते आहेत, याची चाचपणी करावी लागते.
आता केवळ पिंपरी-चिंचवड शहर संलग्न आणि तहसील कार्यालयअंतर्गत येणार्या 30 गावांचा समावेश होणार आहे. त्यामुळे अर्जांचा ताण कमी होणारा असून, इतर अर्ज त्यामध्ये समाविष्ट होणार नाहीत.
दिवसभरात 200 ते 250 अर्ज प्राप्त
सध्या वेगवेगळ्या माध्यमातून म्हणजेच सेतू कार्यालय, शहरातील नागरी सुविधा केंद्र, त्याचप्रमाणे नागरिक स्वतः ऑनलाईनद्वारे दाखल्यांसाठी अर्ज सादर करतात. त्यामुळे दिवसभरात जवळपास 200 ते 250 अर्ज प्राप्त होतात. मात्र, त्यातून आज एकदा नागरिकांकडून इतर गावांचा उल्लेख केला जातो. त्यामुळे तो अर्ज स्वीकारता येत नाही. मात्र, आता ते अर्ज त्या-त्या विभागाशी संलग्न जोडले जाणार आहेत. त्यामुळे आळंदी, लोणीकंद, मुळशी, मावळ अशा वेगवेगळ्या भागातून येणारी अर्ज दाखल होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. परिणामी, प्रशासकीय तसेच येथील कर्मचार्यांचा हा ताण कमीच होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयाला स्वतंत्र कारभार झाल्याने आता दाखल्यांचा ताण कमी होणार आहे. यापूर्वी या कार्यालयास संबंधित दाखले निवडावे लागत होते. मात्र, आता ते थेट दाखल होतील. त्यामुळे दाखले लवकरात लवकर मार्गी लागतील.
- जयराज देशमुख, अप्पर तहसीलदार, पिंपरी चिंचवड
दाखल्यांच्या संकेतस्थळावर स्वतंत्र पिंपरी-चिंचवड असे नमूद केल्याने आता नेमके दाखल्यांचे अर्ज सादर होतील, त्यामुळे ते तपासून पाठवणे सोपे होणार आहे.
- मनीषा माने, नायब तहसीलदार पिंपरी-चिंचवड