
पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात एकूण 3 हजार 102 प्रगणक गट (ब्लॉक) आहेत. चार सदस्यीय 32 प्रभागांचे नकाशे या प्रगणक गटानुसार तयार केली जाणार आहेत. ब्लॉक न फोडता प्रभाग तयार केले जातात. गुगल अर्थ मॅपिंगद्वारे प्रभाग नकाशे तयार केले जाणार आहेत.
पिंपरी-चिंचवड शहर 181 चौरस किलोमीटर क्षेत्रफळात वसले आहे. दापोडी ते निगडी, वाकड ते मोशी अशा प्रमुख सीमा आहेत. त्यात 3 हजार 102 प्रगणक गट आहेत. प्रगणक गट म्हणजे एक ब्लॉक. तो तोडता येत नाही. (Latest Pimpri News)
ब्लॉक कायम ठेवून प्रभागरचना तयार करावी लागते. प्रभागाची सीमारेषा, मोठे रस्ते, गल्ल्या, नद्या, नाले, डोंगर, रस्ते, रेल्वेरूळ, उड्डाण पूल आदी नैसर्गिक मर्यादा विचारात घेऊन प्रभागरचना तयार केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत एका इमारतीचे, चाळीचे, घराचे विभाजन दोन प्रभागांत होणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे, असे महापालिकेच्या अधिकार्यांनी सांगितले.
तीन विधानसभेसह भोरचेही मतदार
पिंपरी, चिंचवड, भोसरी व भोर विधानसभा मतदारसंघातील मतदारांना महापालिका निवडणूक मतदान करता येणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी, चिंचवड व भोसरी हे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. भोर विधानसभा मतदारसंघात ताथवडे गावाचा भाग समाविष्ट आहे. या चार मतदारसंघातील मतदार महापालिका निवडणुकीत मतदान करतील.
विधानसभेसाठी नोव्हेंबर 2024 ला मतदान झाले. त्या आकडेवारीनुसार विधानसभा निवडणुकीच्या वेळी पिंपरी मतदारसंघात 3 लाख 91 हजार 607 मतदार आहेत. चिंचवड मतदारसंघात 6 लाख 63 हजार 622 मतदार आहेत. भोसरी मतदारसंघात 6 लाख 8 हजार 425 मतदार आहेत. तर, भोर मतदारसंघात अंदाजे 12 हजार मतदार आहेत. शहरात एकूण 16 लाख 75 हजार 654 मतदार आहेत.
सन 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या : 17 लाख 27 हजार 692
अनुसूचित जातीची लोकसंख्या : 2 लाख 73 हजार 810
अनुसूचित जमातीची लोकसंख्या : 36 हजार 535
एकूण प्रभाग : 32
एकूण प्रगणक गट : 3 हजार 102
एकूण नगरसेवक : 128