Sangvi Smart Water Meter: सांगवीत स्मार्ट वॉटर मीटरवरून वाद; नागरिकांच्या विरोधानंतर काम थांबवले

गढूळ पाणी आणि अनियमित पुरवठ्याने नागरिक त्रस्त; आधी पाणीपुरवठा सुधारण्याची मागणी
Smart Water Meter
Smart Water MeterPudhari
Published on: 
Updated on: 

सांगवी: जुनी व नवी सांगवीत अनेक महिन्यांपासून गढूळ पाणी, अनियमित पाणीपुरवठा, कमी दाबाने पाणी येणे आणि पाणीकपात अशा विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अद्याप पूर्णपणे सुटलेला नसताना आता सांगवीत स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याच्या मोहिमेमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. विशेष म्हणजे, नागरिकांना विश्वासात न घेता आणि पूर्वसूचना न देता जुन्या मीटरच्या जागी नवीन स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

Smart Water Meter
Maval Graduate Teacher Constituency Election: मावळात पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी ३,४९९ मतदार; १२ मतदान केंद्रे सज्ज

जुनी सांगवीतील मधुबन सोसायटी परिसरात स्मार्ट वॉटर मीटर बसवण्याचे काम सुरू असताना नागरिक आणि कंत्राटदार यांच्यात तणाव निर्माण झाला. नागरिकांच्या विरोधानंतर या कामाबाबत प्रश्न उपस्थित होऊ लागले असून, पाणीपुरवठ्याच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी नव्या योजनेवर खर्च कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आधी स्वच्छ पाण्याची हमी द्या, मग स्मार्ट मीटरचा प्रयोग करा!

गेल्या वर्षभरापासून सांगवी परिसरातील नागरिकांकडून पाण्याच्या गुणवत्तेबाबत तक्रारी केल्या जात आहेत. पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आल्यानंतर काही प्रमाणात पाण्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाल्याचे नागरिक सांगतात. मात्र, त्यानंतरही पाणीकपात, अनियमित पुरवठा आणि कमी दाबाने पाणी येण्याच्या समस्या कायम असल्याची त्यांची तक्रार आहे. सांगवीच्या तुलनेत पिंपळे गुरव परिसरात चांगला पाणीपुरवठा होत असल्याची भावना अनेक नागरिक व्यक्त करतात. त्यामुळे पाणीपुरवठ्यातील तफावत दूर करण्याची मागणी होत असताना सांगवीतच वारंवार नवनवीन प्रयोग का केले जातात, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Smart Water Meter
Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा प्रचार जोरात

जुने मीटर सुरू असतानाही बदलल्याचा आरोप

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही ठिकाणी जुने मीटर सुरू असतानाही ते काढून नवीन स्मार्ट मीटर बसवण्यात आले. काही नागरिकांना जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसवण्यास हरकत असल्याचेही सांगण्यात आले आहे. मीटर बदलण्याची गरज, त्यामागील नियम आणि नागरिकांना देण्यात येणारी पूर्वसूचना याबाबत महापालिकेने स्पष्ट भूमिका मांडणे गरजेचे आहे.

स्मार्ट मीटर नेमके कशासाठी?

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याची चोरी रोखणे, मीटर नसलेल्या जोडण्यांमधील पाण्याचा वापर मोजणे आणि प्रत्येक ग्राहक किती पाणी वापरतो, याची माहिती मिळवणे हा स्मार्ट मीटर बसवण्यामागील उद्देश आहे. या प्रणालीद्वारे पाणी वापराची माहिती ऑनलाइन पाणीपुरवठा विभागाला उपलब्ध होऊ शकते. त्यानुसार पाण्याच्या वापराचे मोजमाप आणि बिलिंग करणे शक्य होणार आहे. नायडू टाकीच्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबवला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या प्रयोगाची माहिती नागरिकांना आधी का देण्यात आली नाही? जुन्या मीटरच्या जागी नवीन मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांची संमती किंवा हरकती विचारात घेतल्या का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

Smart Water Meter
Pimpri Chinchwad Dasara: पिंपरी-चिंचवडमध्ये दसऱ्याचा उत्साह; २१८ मिरवणुका, २४ ठिकाणी रावणदहन

एका कामासाठी तीन कंत्राटदारांची साखळी?

स्मार्ट मीटर बसवण्याच्या कामाबाबत कंत्राटदारांच्या साखळीचाही मुद्दा समोर आला आहे. मूळ कंत्राट एका कंत्राटदाराला देण्यात आले आणि त्यानंतर हे काम दुसऱ्या व पुढे तिसऱ्या कंत्राटदाराकडे सोपवण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रक्रियेत प्रत्यक्ष कामाची जबाबदारी कोणाची, कामाच्या गुणवत्तेवर देखरेख कोण करणार आणि खर्चावर नियंत्रण कसे ठेवले जाणार, याबाबत स्पष्टता आवश्यक आहे. महापालिका एका बाजूला पाणीटंचाई आणि आर्थिक मर्यादांचा मुद्दा मांडत असताना दुसऱ्या बाजूला अशा योजनांवर खर्च केला जात असल्याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या कामाची कंत्राटी प्रक्रिया, खर्च आणि जबाबदारी यांची महापालिकेने स्पष्ट माहिती द्यावी, अशी मागणी होत आहे.

सांगवीकरांच्या प्रश्नांची उत्तरे कोण देणार?

स्मार्ट वॉटर मीटर ही पाण्याच्या वापराचे अचूक मोजमाप करण्यासाठी उपयुक्त ठरू शकणारी आधुनिक प्रणाली आहे. मात्र, कोणतीही योजना राबवताना नागरिकांना पूर्वकल्पना देणे, मीटर बदलण्याची गरज स्पष्ट करणे, खर्चाची माहिती उपलब्ध करून देणे आणि तक्रारींचे निराकरण करणे आवश्यक आहे. सांगवीकरांची मागणी स्मार्ट मीटरला विरोध करण्यापुरती मर्यादित नसून, त्यांना नियमित, स्वच्छ आणि पुरेशा दाबाने पाणी मिळावे, ही आहे. त्यामुळे महापालिकेने स्मार्ट मीटरच्या प्रयोगाबाबत पारदर्शकता ठेवून पाणीपुरवठ्याच्या प्रलंबित समस्यांवरही ठोस उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Smart Water Meter
Pimpri Chinchwad Cyber Fraud: शेअर बाजारातील ८६ लाखांच्या फसवणूक प्रकरणात नऊ आरोपींवर मकोका; कंबोडियातील सूत्रधाराशी धागेदोरे

सांगवीकरांना आधीच पाण्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कधी गढूळ पाणी, कधी कमी दाबाने पुरवठा, तर कधी अनियमित पाणी येते. या समस्या आधी सोडवणे गरजेचे आहे. स्मार्ट मीटर बसवण्यापूर्वी नागरिकांना विश्वासात घेऊन त्याची माहिती द्यायला हवी होती.

अशोक पवार, नागरिक.

जुना मीटर सुरू असताना तो बदलण्याची गरज काय? स्मार्ट मीटरमुळे नेमका काय फायदा होणार, त्याचा खर्च किती आणि नागरिकांच्या बिलावर काय परिणाम होणार, याची माहिती सर्वांना मिळाली पाहिजे. महापालिकेने आधी पाणीपुरवठा नियमित करावा आणि त्यानंतरच अशा प्रयोगांबाबत नागरिकांशी चर्चा करावी.

संजय देशमुख, नागरिक

पाण्याची चोरी रोखणे, मीटर नसलेल्या जोडण्यांमधील पाण्याचा वापर मोजणे आणि प्रत्येक ग्राहक किती पाणी वापरतो, याची माहिती मिळवणे हा स्मार्ट मीटर बसवण्यामागील उद्देश आहे. नायडू टाकी परिसरात हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येत आहे. मात्र, या कामाबाबत नागरिकांनी हरकत घेतल्यानंतर सध्या स्मार्ट मीटर बसवण्याचे काम थांबवण्यात आले आहे.

संभाजी गायकवाड, अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news