

पिंपरी: शेअर बाजारातील गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या संघटित सायबर गुन्हेगारी टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ‘मकोका’चा दणका दिला आहे. बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून एका ज्येष्ठ नागरिकाची ८६ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नऊ आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. या गुन्ह्यात सहा आरोपींना अटक झाली असून, त्यांचे धागेदोरे थेट कंबोडियातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
तेजस ज्ञानोबा लोखंडे (२४, रा. मरकळ, पुणे), अविनाश ज्ञानोबा बाकलिकर (२८, रा. लातूर), हर्षल दिलीप बोरा (३४, रा. अहिल्यानगर), सोनू हरिष शर्मा (२१, रा. नवी मुंबई), गौरव रमेश गाडगे (२४, रा. मुंबई) आणि आखील श्रीनिवासराव नेल्लुरी (२४, रा. हैदराबाद, तेलंगणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ नागरिकाला बनावट ट्रेडिंग ॲपच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले होते. त्यांचा विश्वास संपादन करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये एकूण ८६ लाख रुपये जमा करून घेण्यात आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार १७ जुलै २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी आर्थिक व्यवहार तपासले असता फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांत वळविण्यात आल्याचे आढळले. संबंधित खातेदारांची चौकशी आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पुणे, लातूर, अहिल्यानगर, नवी मुंबई आणि हैदराबाद येथून सहा आरोपींना अटक केली. तपासादरम्यान बँक खात्यांमध्ये गोठविण्यात आलेल्या २८ लाख रुपयांची रक्कम फिर्यादीला परत मिळण्यासाठी न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत.
तपासात आरोपींनी आर्थिक फायद्यासाठी संघटित टोळी तयार केल्याचे निष्पन्न झाले. सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणुकीची आकर्षक आमिषे दाखवून नागरिकांना जाळ्यात ओढले जात होते. त्यानंतर वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे स्वीकारून फसवणुकीची रक्कम डिजिटल माध्यमातून पुढे वळविली जात होती. आरोपी फसवणुकीतून मिळालेली रक्कम यूएसडीटीसारख्या आभासी चलनात रूपांतरित करीत होते. कंबोडियातील मुख्य आरोपीच्या संपर्कात राहून ही टोळी गुन्हे करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाच्या तपासाला आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचेही स्वरूप प्राप्त झाले. टोळीतील आरोपींविरुद्ध पिंपरी-चिंचवड, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर तसेच गुजरातमध्ये फसवणुकीसह अपहरण, खंडणी, दरोडा, अमली पदार्थ तस्करी आणि बनावट कागदपत्रे तयार करण्यासंबंधीचे गुन्हे आहेत. संघटित गुन्हेगारीतून आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने टोळी कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यानंतर मकोकांतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस आयुक्त रोहिणी बानकर करीत आहेत.
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, सहपोलिस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अपर पोलिस आयुक्त सारंग आवाड, बसवराज तेली, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार आणि सहायक पोलिस आयुक्त रोहिणी बानकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, पोलि सनिरीक्षक दिगंबर गायकवाड, सहायक पोलिस सनिरीक्षक प्रवीण स्वामी, वैभव पाटील, पोलिस उपनिरीक्षक सागर पोमण, रोहित डोळस, प्रकाश कातकडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सायबर गुन्हेगारांवर वर्षातील दुसरा ‘मकोका’
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाने २०२६ मध्ये सायबर फसवणुकीतील संघटित गुन्हेगारी टोळीवर दुसऱ्यांदा मकोकांतर्गत कारवाई केली आहे. ऑक्टोबर महिन्यात एका टोळीतील नऊ आरोपींवर ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी शरीराविरुद्ध आणि मालमत्तेविरुद्ध गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवर मकोकाचा वापर होत होता. आता संघटित सायबर फसवणुकीच्या टोळ्यांनाही या कायद्याच्या कचाट्यात आणण्यासाठी पोलिसांनी भर दिला आहे.
२८ लाख परत मिळण्याचा मार्ग मोकळा
फसवणुकीची रक्कम विविध बँक खात्यांत वळविण्यात आल्याने सायबर पोलिसांनी आर्थिक व्यवहारांचा तपासले. दरम्यान, संबंधित खात्यांमधील २८ लाख रुपये गोठविण्यात आले. ही रक्कम फिर्यादीला परत करण्याबाबत न्यायालयाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यामुळे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाला काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.