

पिंपरी: नियम धाब्यावर बसून, बेकायदा पद्धतीने विद्यार्थी वाहतूक करणार्या बसचालकांना पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) दणका दिला. मोटार वाहन कायद्यातील नियमांचे उल्लंघन करणार्या 78 स्कूल बसेस आणि 37 इतर वाहनांवर कारवाई करण्यात आली.
कारवाईत 10 लाख 38 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. दरम्यान ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार असून आणखीन तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सांगितले. (Latest Pimpri News)
शहरात खासगी आणि महापालिकेच्या मिळून 665 प्राथमिक, उच्च माध्यमिक शाळा आहेत. यात सुमारे अडीच लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. अनेक विद्यार्थी स्कूलबसमधून ये-जा करतात. पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाकडे तीन हजार 195 स्कूल बसची नोंद आहे. बसव्यतिरिक्त व्हॅन आणि रिक्षांमधूनही विद्यार्थांची वाहतूक केली जाते. यातील बहुतांश वाहनांतून क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थांची वाहतूक होत असल्याचे उघडपणे दिसते.
शालेय विद्यार्थ्यांवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांचे देखील समोर येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या वाहनांमध्ये ’सीसीटीव्ही’ आणि ’ट्रॅकिंग’ प्रणाली बसविणे बंधनकारक केले आहे. त्यानंतर ही अनेक स्कूल बस चालकांकडून या नियमांची पुर्तता झालेली नाही. या वाहन चालकांनी ‘आरटीओ’ आदेश धाब्यावर बसविल्याचे दिसते.
वायुवेग पथक सक्रिय
परिवहन विभागाच्या वायूवेग पथकाकडून विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने थांबवून वाहनांची तपासणी केली जाते. एक एप्रिल ते 30 जूनदरम्यान विशेष तपासणी मोहिमेत 237 बस आणि 111 इतर वाहनांची तपासणी झाली. यात विनापरवाना अथवा परवान्याच्या अटींचा भंग करणे, योग्यता प्रमाणपत्र नसणे, वाहनात बेकायदा फेरबदल करणे, क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, कर न भरणे अशा नियमांचे उल्लंघन करणार्या झाल्याचे दिसले. त्यामुळे 78 स्कूल बस आणि 37 इतर स्कूल वाहनांवर कारवाई करण्यात आली.