UPI Fraud: स्क्रीनशॉटचा 'शॉट'! दुकानात बनावट यूपीआय ‘पेड’ मेसेज दाखवून ठग पसार

सायबर पोलिसांचा व्यापार्‍यांना सावधानतेचा इशारा
UPI payment
UPI Fraud |बनावट यूपीआय ‘पेड’ मेसेजPudhari File Photo
Published on
Updated on

पिंपरी : कॅशलेस व्यवहारांच्या जमान्यात डिजिटल पेमेंट्सचा झपाट्याने वापर वाढत असताना, काही फसवणूक करणार्‍यांनी व्यापार्‍यांना गंडवण्याचे नवे तंत्र अवलंबले आहे. गुगल पे, फोन पे यांसारख्या यूपीआय अ‍ॅप्सचा खोटा ‘पेड’ स्क्रीनशॉट तयार करून, पैसे दिल्याचा भास निर्माण केला जातो. व्यापार्‍यांकडून वस्तू घेऊन हे ठग पसार होतात. त्यामुळे किरकोळ दुकानदार, भाजी विक्रेते, फूड स्टॉल चालक यांच्या डोक्याला फेक स्क्रीनशॉटचा ‘शॉट’ बसत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

अशी आहे फसवणुकीची ‘मोडस्’

या प्रकारात आरोपी योजनाबद्धरीत्या काम करतात. ते आधीपासून बनावट ‘पेड’ स्क्रीनशॉट मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवतात. खरेदी करताना व्यवहार केल्याचा भास निर्माण करत पेमेंट झाले आहे असे सांगितले जाते. त्यासाठी बनावट स्क्रीनशॉट दुकानदाराला दाखवतात. गर्दी, घाई, आणि गडबड असल्याचा फायदा घेत दुकानदार खात्री न करता वस्तू देतो. विशेष म्हणजे, काही आरोपी फेक अ‍ॅपद्वारे ‘लाईव्ह ट्रान्झॅक्शन’चे नाटक करतात, ज्यामुळे संबंधित दुकानदारास व्यवहार खरा झाल्याची खात्री पटते.

UPI payment
Pune Crime: संपत्तीपायी बहिणीला मनोरुग्णालयात, तर आईला वृद्धाश्रमात पाठविले; शेजाऱ्यांमुळे सुटका, पुण्यात निर्दयी भावाला अटक

तपासात पोलिसांना अडचणी

या प्रकारांमध्ये व्यवहार प्रत्यक्षात होत नसल्याने, पोलिसांना तत्काळ आरोपीला पकडणे अवघड जाते. व्यवहाराचा पुरावा उरलेला नसतो आणि आरोपी तेवढ्या वेळेत पसार झालेला असतो. एकाच बनावट स्क्रीनशॉटचा वापर करून वेगवेगळ्या दुकानांत फसवणूक केल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.

फसवणुकीसाठी अ‍ॅप्सचा वापर

सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार,UPI Generator, Fake Receipt Maker यांसारखी बनावट अ‍ॅप्स इंटरनेटवर सहज उपलब्ध असून, त्यांचा वापर करून गुन्हेगार हुबेहूब यूपीआय रिसीट बनवतात. त्यामुळे व्यवहार झाल्याचा भास निर्माण होतो. व्यवहारानंतर स्वतःच्या खात्यावर पैसे जमा झालेत का, याची खात्री करणे व्यापार्‍यांसाठी अत्यावश्यक आहे.

साउंड बॉक्स, सीसीटीव्ही वापर आवश्यक

सायबर पोलिसांनी व्यापार्‍यांना दुकानात स्पष्ट दिसणारा सीसीटीव्ही कॅमेरा ठेवण्याचा सल्ला दिला आहे. व्यवहारानंतर साउंड अलर्ट देणारे ‘यूपीआय साउंड बॉक्स’ वापरल्यास पेमेंटचे ऑडिओ कन्फर्मेशन मिळते. त्यामुळे फसवणूक टाळता येते. याशिवाय सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयितांची ओळख पटवणे सोपे जाते.

UPI payment
पिंपरी : खंडणी मागितल्याने नऊ जणांवर गुन्हा

कॅम्पमधील व्यावसायिकाचा अनुभव

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. पिंपरी कॅम्पमधील एका मोबाईल शॉपच्या चालकाने सांगितले, 500 रुपयांचे अ‍ॅक्सेसरी विकल्यावर ग्राहकाने पेमेंट झाल्याचा स्क्रीनशॉट दाखवला. काही वेळानंतर खाते तपासले असता रक्कम जमा झाली नव्हती. बाहेर जाऊन पाहिले असता तो ग्राहक पळून गेला होता.

काय काळजी घ्यावी?

  • ग्राहकाने स्वतःच्या मोबाईलवर

  • दाखवलेल्या स्क्रीनशॉटवर विश्वास ठेवू नये.

  • स्वतःच्या यूपीआय अ‍ॅपमध्ये ‘ट्रान्झॅक्शन हिस्टरी’ तपासावी.

  • एसएमएस, बँक अ‍ॅपद्वारे पैसे खात्यावर जमा झालेत का, याची पडताळणी करावी.

  • नवीन ग्राहकांशी मोठे व्यवहार करताना चेहरा, मोबाईल क्रमांक अन् शक्य झाल्यास वाहन क्रमांक नोंद करून ठेवावा.

  • फसवणुकीची तक्रार त्वरित स्थानिक पोलिस ठाणे किंवा सायबर विभागाकडे करावी.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news