

पिंपरी: महापालिका हद्दीतील शगुन चौक, पिंपरीगाव या भागांत विनापरवाना झाडांची कत्तल केली जात आहे. त्यासंदर्भात वृक्षप्रेमींकडून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने घराची डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी घर बांधणीसाठी व दुरुस्तीसाठी अडचणी आणणारे काही झाडे विना परवाना छाटणी केल्यामुळे वृक्षप्रेमींकडून संबंधित नागरिकांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. (Latest Pimpri News)
पिंपरी, मासुळकर कॉलनी, पिंपरीगाव, वल्लभनगर, पिंपरी औद्योगिक वसाहत, एच ए वसाहत या परिसरात काही दिवसांपासून विनापरवाना वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. शहराच्या विविध भागांत जाहिरात होर्डिंगसाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे. खासगी तसेच महापालिकेच्या जागेतील झाडे विनापरवाना तोडली जात आहेत.
पिंपरीतील शगुन चौक, टेल्को रस्ता, नानेकर चाळ, भाजी मंडई, मोरवाडी कोर्ट या भागात विनापरवाना झाडे तोडण्यात आली. जाहिरात होर्डिंग दिसावेत म्हणून झाडांची कत्तल करण्यात आली. यासंदर्भात उद्यान विभागाकडे तक्रार दाखल केली परंतु उद्यान विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. म्हणून शहरात टपरीला सपोट देण्यासाठी किंवा जाहिरात फलक दिसावेत यासाठी वृक्षतोड सुरू आहे, असे नागरिकांमधून बोलले जात आहे.
घरासमोर झाडाच्या फांद्या लोंबकळलेल्या अवस्थेत दिसू नये, घरबांधणी अडचणी दूर व्हावी यासाठी पिंपरी शहरात विना परवाना झाडाच्या फांद्या छाटून दिवसा ढवळ्या झाडांची कत्तल केली जात आहे. तरी उद्यान विभागाने झाडांचे सर्वेक्षण करून झाडांचे संगोपन करावे.
राहुल तंबरे, निसर्गप्रेमी
महापालिकेच्या वतीने सारख्या सूचना देऊनही पिंपरी शहर, उपनगरात वेगवेगळ्या भागात अनधिकृतपणे विनापरवाना वृक्षांची कत्तल जात आहे. वृक्षतोडीला रोखण्यासाठी महापालिका उद्यान विभागाच्या वतीने कारवाईची मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत पिंपरी शहर उपनगरात विविध ठिकाणांच्या वृक्षांचे सर्वेक्षण करून विना परवाना वृक्षतोड करणार्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.
- राजेश वसावे, सहायक वृक्षसंवर्धन उद्यान अधीक्षक, महापालिका.