

पुणे: नेतृत्वाच्या स्पर्धेत पुढे जाण्यासाठी बेताल व वादग्रस्त वक्तव्ये आणि कृती करून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद पेटवून राज्य अशांत करण्याचा डाव लक्ष्मण हाकेसारख्या लोकांकडून होत आहे. शासनाने अशा व्यक्तींवर कडक कारवाई करावी. त्याचबरोबर सर्वच योजनांचा आढावा घ्यावा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समनव्यक राजेंद्र कोंढरे, राजेंद्र कुंजीर, डॉ धनंजय जाधव, तुषार काकडे, राष्ट्र समूह सेवाचे राहुल पोकळे, अश्विनी खाडे पाटील, भाग्यश्री बोरकर यांसह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोंढरे म्हणाले, सारथी संस्थेला दिलेल्या निधीवरुन महाज्योती बाबतीत कथीत भेदभाव केल्याच्या निषेधार्थ बनावट प्राध्यापक पद लावून राज्य मागासवर्ग आयोगाची आणि शासनाची फसवणूक करणारे, लक्ष्मण हाके व काही विद्यार्थ्यांनी मुंबईतील गिरगांव चौपाटीवर जलसमाधी आंदोलनाचा स्टंट केला. तो करताना कारण नसताना त्यांनी सारथी संस्थेस व मराठा समाजास दिलेल्या सवलतींचा उल्लेख केला, त्यांनी त्यांचे आंदोलन करावे.
मात्र गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये निरनिराळ्या जाती जमातींमध्ये तणाव निर्माण करण्यासाठी हाकेंसारख्या अनेक मंडळींकडून राज्यातील ठराविक लोकाकडून वादग्रस्त बेताल वक्तव्य केली जात आहेत. ओबीसीच्या नावावर दुकानदारी चालविणाऱ्या अशा प्रवृतीला थारा देऊ नये, त्यांना अटक करून त्यांचेवर कडक कारवाई करावी. केवळ अदखलपात्र गुन्हा दाखल करत असल्याने कायद्याचा धाक राहिलेला नाही. संबंधितांवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शासनाने २०१८-१९ पासून ३४,३१९ कोटी रुपये या विभागाच्या विविध प्रकारच्या योजनांसाठी शासनाने खर्च केले आहे. ओबीसी प्रवर्गासाठी १०० मुले १०० मुलीकरिता ७२ होस्टेल सुरु आहेत. याशिवाय राज्यातील ७ विभागात एकूण ९८० निवासी आश्रमशाळा आहेत. अनुसुचित जाती व अनुसुचित जाती व ओबीसी, विजाभज, विमाप्र या प्रवर्गासाठी शासनाकडे स्वतंत्र खाते तसेच निधी आहे. तसा मराठा समाजासाठी किंवा या प्रवग्रांच्या व्यतिरिक्त घटकांसाठी शासनाचा कोणतेही स्वतंत्र खाते नसल्याचे कुंजीर यांनी यावेळी सांगितले.
हाके यांनी पवारांचे आभार मानावे
लक्ष्मण हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली. वास्तविक मराठा समाजाचा तो अधिकार आहे. पवार यांनी ओबीसी समाजासाठी 10 वरून 29 टक्के आरक्षण केले आहे. त्यामुळे लक्ष्मण हाके यांनी त्यांच्यावर टीका करण्याऐवजी आभार मानावे, अशी अपेक्षा राजेंद्र कोंढरे यांनी यावेळी केली.