

पिंपळे गुरव: परिसरात भटक्या कुत्र्यांच्या उपद्रव वाढला असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. रस्त्यावरुन चालणार्या नागरिकांचा तसेच वाहनांचा ही कुत्री पाठलाग करत असल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
सुदर्शननगर परिसरात भटकी कुत्री वाहनांच्या मागे लागत आहेत. नुकतेच लहान मुले व वृद्धांवर कुर्त्यांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय रेबीजसारख्या जीवघेण्या आजाराचा धोका वाढला आहे. उघड्यावर पडलेल्या कचर्यातून अन्न मिळत असल्याने त्यांची संख्या वाढत आहे. (Latest Pimpri News)
स्थानिक नागरिकांनी सांगितले, की रस्त्यावरील कुर्त्यांमुळे विशेषतः पहाटे व रात्रीच्या वेळी वाहनचालक आणि पादचारी यांना भीती वाटते. नागरिकांनी याबाबत अनेकदा तक्रारी करुनही ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. प्रशासनाने तातडीने कुर्त्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी आणि त्यांचा योग्य बंदोबस्त करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
अपघाताची भीती
पिंपळे गुरव परिसरातील सुदर्शननगर, कल्पतरू सोसायटी, सृष्टीचौक या ठिकाणी भटक्या कुर्त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. रस्त्यांवर, गल्लीबोळात तसेच सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांच्या झुंडी फिरत असल्याने त्याचा त्रास नागरिक व वाहनचालकांना होत आहे.
रात्रीच्यावेळेस दुचाकीवरुन जाणार्या वाहनचालकांच्या अंगावर भटके कुत्रे भुंकत जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळत आहे. वाहनांचा प्रकाश दिसताच पाठीमागून ते धावत येतात, या परिस्थितीत दुचाकी जोरात चालवल्यास गंभीर अपघात होण्याची दाट शक्यता आहे. शहरात या कुत्र्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
सकाळी मुलांना शाळेत सोडायला जावे लागते. चौकामध्ये पाच-सहा कुत्री टोळक्याने बसलेले असतात. नागरिकांना बघून भूंकत असतात. पशुवैद्यकीय विभागाने लवकरात लवकर त्यांचा बंदोबस्त करावा.
- बळवंत पाटील, स्थानिक नागरिक
कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी व लसीकरण करून पुन्हा ते त्यांच्या ठिकाणी सोडले जाते. दोन दिवसांत गाडी पाठवून कुत्र्यांना पकडून नेण्यात येईल. नागरिकांनी हल्लेखोर व पिसाळलेल्या कुत्र्यांची तक्रार तात्काळ महापालिकेच्या हेल्पलाइनवर करावी.
- अरुण दगडे, पशुवैद्यकीय अधिकारी