

Independence Day decoration
पिंपरी: स्वातंत्र्य दिनानिमित्त पिंपरी बाजारपेठ तिरंगी झेंडे आणि सजावटीचे सामानाने सजली आहे. तिरंगी रंगातील झुरमुळ्या, बॅच तसेच सजावटीच्या विविध वस्तुंमुळे बाजारपेठ तिरंगी झाली आहे. यंदा धाग्यांनी विणलेले, कुंदन व टिकल्यांचा वापर केलेले तिरंगी वॉलपीस बाजारात विक्रीस ठेवलेले दिसून येत आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या विशेष कार्यक्रमासाठी विविध संस्था, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये विविध सजावटीचे साहित्य खरेदी करतात. या खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे. (Latest Pimpri News)
तिरंग्यांची थीम असणारे कपडे
तिरंगी रंगाच्या थीमचे खादीचे कपडे, टोपी, तिरंग्याची थीम असणारे जॅकेट्स, टी-शर्ट, ओढण्या अशा कपड्याच्या विक्रीस ठेवल्याचे दिसून येत आहे. कुर्ता, पायजमा किंवा पांढर्या कुत्र्याला बाजारपेठेमध्ये अधिक मागणी आहे.
शाळा-कॉलेजात जय्यत तयारी
स्वातंत्र्य दिनासाठी शहरातील शाळा, महाविद्यालयांमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पीटी, शौर्यगीत, लेझीम, बँड, पथ संचलन अशा विविध कार्यक्रमांच्या रंगीत तालमींनी सगळीकडे चैतन्याचे वातावरण आहे.
स्वातंत्र्य दिनासाठी शाळेची स्वच्छता, वर्गांची सजावट, विविध साहित्यांची दुरुस्ती, विविध पथकांची संचलनाची तयारी अशा प्रकारे संपूर्ण परिसरामध्ये प्रसन्न वातावरण असते. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी विविध शाळांमधून काढल्या जाणार्या प्रभात फेरी यांचे सर्वांनाच विशेष आकर्षण असते. झेंडा वंदनासह विविध स्पर्धांचे आयोजनही या निमित्ताने करण्यात येते.