

पिंपरी: ई पॉस मशिनला आलेल्या अडचणींमुळे पाच दिवसांपासून धान्य वाटप पूर्णपणे ठप्प झाले आहे. परिणामी, साडेतीन लाख शिधापत्रिकाधारकांचे हाल होत असून, अडीचशेच्या वर स्वस्त धान्य दुकानदारांना शिधापत्रिकाधारकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तर, लाभार्थ्यांचे दुकानांत हेलपाटे सुरूच आहेत. दरम्यान, यासाठी आणखी दोन दिवस लागणार असल्याचे बोलले जात आहे.
मागील महिन्यातही तांत्रिक अडचणी
ई-पॉस यंत्रामधील निर्माण होणार्या तांत्रिक अडथळ्यांमुळे तर राज्यभरातूनच ही समस्या निर्माण झाली असून, दोन दिवसांत प्रक्रिया सुरू होणार आहे. दरम्यान, शासनाने जून ते ऑगस्ट या कालावधीत तीन महिन्यांचे धान्य एकत्र करुन वाटप करण्याच्या सूचना दिल्या होत्या. (Latest Pimpri News)
मात्र, प्रत्यक्षात दोनच महिन्यांचे धान्य दुकानांमध्ये पोचले आहे. ते वाटप करत असतानाच ई-पॉस यंत्रात पुन्हा अडथळे आल्याने शिधापत्रिकाधारकांचा संताप उफाळून आला आहे.
पावसाळ्यात लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी केलेली योजनेला प्रत्यक्षात तांत्रिक बिघाडांमुळे विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील महिन्यातही तब्बल 10 ते 15 दिवस ई-पॉस यंत्र बंद पडल्याने धान्य वाटप बंद राहिले होते. त्यावेळी शासनाकडून तांत्रिक अडचणी दूर झाल्या असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, प्रत्यक्षात समस्या कायम आहेत. त्यामुळे धान्य वाटप नेमके सुरळीत कधी होणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत. शहरातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदार सध्या त्रस्त झाले असून, धान्य घेण्यासाठी दुकानांवर येणार्या शिधापत्रिकाधारकांना वारंवार रिकाम्या हाताने परतावे लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर धान्य वाटप सुरळीत करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
ई-पॉस यंत्रावर ताण आला आहे. त्यामुळे यात तांत्रिक अडथळे निर्माण होत आहेत. येत्या दोन दिवसांत ही समस्या सुटेल.
- प्रशांत खताळ, अन्नधान्य वितरण व पुरवठा अधिकारी पुणे