

Clerk involved in hospital financial fraud
पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या रक्कमेतील दहा लाख रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यात केलेल्या बिलांच्या तपासणीत लिपिक आकाश गोसावी हा दोषी आढळला आहे. त्याच्यावर वेतनवाढ रोखण्याची कारवाई आयुक्त शेखर सिंह यांनी केली आहे.
जिजामाता रुग्णालयामध्ये उपचार शुल्कापोटी रुग्णांकडून घेतलेल्या रक्कमेवर वैद्यकीय अधिकारी व लिपिकाने डल्ला मारला. शुल्कापोटी 18 लाख 66 हजार 356 रुपये जमा झाले असताना बँकेत फक्त 8 लाख 89 हजार 665 रुपये जमा केले. एकूण 9 लाख 76 हजार 691 रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याची तक्रार काँग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी केली होती. (Latest Pimpri News)
मागील पाच वर्षांचे लेखापरीक्षण -
त्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले होते. जिजामाता रुग्णालयात झालेल्या अपहाराबाबत लिपिक गोसावी हा रुग्णालयात रूजू झाल्यापासून म्हणजेच सन 2021 पासून ते अपहार झाल्याच्या दिनांकापर्यंत या प्रकरणाशी संबंधित सर्व पावती पुस्तके, चलने, बिले व सर्व अभिलेखांचे तातडीने पथक नेमून लेखापरीक्षण करण्यात आले. चौकशी समितीने केलेल्या चौकशीमध्ये लिपिक गोसावी याच्यावर केलेले आरोप त्याने मान्य केले. त्यानुसार विभागप्रमुखांनी कारवाई करण्याबाबत शिफारस केली होती.
दोन वेतनवाढी थांबवल्या
लिपिक गोसावी यांच्या पुढील वेतनवाढीवर परिणाम होतील अशा दोन वेतनवाढ रोखण्यात येणार आहेत. तसेच, विशेष लेखापरीक्षण अहवालानुसार त्याच्याकडून 600 रुपये वसूल करण्यात येणार आहेत. यापुढे कोणत्याही प्रकारच्या कार्यालयीन कामकाजामध्ये गैरवर्तन केल्याचे किंवा नियमबाह्य कामकाज केल्याचे निदर्शनास आल्यावर त्याच्यावर जबर दंडाची कारवाई करण्यात येईल. यापुढे त्याच्याकडे आर्थिक स्वरुपाचे कामकाज सोपवण्यात येऊ नये. याची नोंद त्याच्या सेवापुस्तकात करावी, असे आदेश आयुक्त सिंह यांनी दिले आहेत.