Pune Graduate Teacher Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघात महायुतीचा विजय निश्चित; मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

पिंपरी-चिंचवडमध्ये महायुतीचा एकजुटीने प्रचार; डॉ. स्मिताताई जाधव आणि कौस्तुभ गावडे यांच्या विजयाचा संकल्प
Pune Graduate Teacher Constituency Election
Pune Graduate Teacher Constituency ElectionPudhari
Published on: 
Updated on: 

पिंपरी: भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या महायुतीतील पक्षांची पिंपरी-चिंचवड शहरात मोठी ताकद आहे. सर्व मित्रपक्षांत अनुभवी नेते आहेत. महायुतीच्या एकत्रित ताकदीमुळे डॉ. स्मिताताई योगेश जाधव आणि कौस्तुभ गावडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी (दि.१९) महायुतीच्या मेळाव्यात व्यक्त केला. या मेळाव्यात दोन्ही उमेदवारांच्या विजयाचा संकल्प करण्यात आला.

Pune Graduate Teacher Constituency Election
Maval TP Scheme: मावळातील टीपी स्कीम रद्द होणार? शेतकऱ्यांच्या विरोधावर पीएमआरडीएचा मोठा निर्णय

पुणे पदवीधर मतदार संघाच्या उमेदवार

डॉ. स्मिताताई योगेश जाधव, शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात महायुतीचा मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी मोहोळ बोलत होते. व्यासपीठावर आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, आमदार उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, माजी आमदार अश्विनी जगताप, भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष योगेश बहल, शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस, भारतीय रिपब्लिकन पाटी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष कुणाल वाव्हळकर, भाजपचे शहर प्रभारी भरत पाटील, उपमहापौर शर्मिला बाबर, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, शिवसेना गटनेते विश्वजित बारणे, माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, शिवसेना उपनेत्या सुलभा उबाळे, माजी महापौर संजोग वाघेरे, अ‍ॅड. गोरक्ष लोखंडे, भाजप पदवीधर मतदार समन्वयक राजू पिल्ले, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, विकास डोळस, मधुकर बच्चे, वैशाली खाडये, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मित्रपक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Pune Graduate Teacher Constituency Election
Sangvi Smart Water Meter: सांगवीत स्मार्ट वॉटर मीटरवरून वाद; नागरिकांच्या विरोधानंतर काम थांबवले

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी येत्या शुक्रवार (दि. २३) रोजी मतदान होत आहे. शहरातील पदवीधर मतदारसंघात एकूण ७ हजार २८१ आणि शिक्षक मतदारसंघात २ हजार ९४ मतदार आहेत. महायुतीचे सर्वच नेते उमेदवारांच्या प्रचारात व्यस्त आहेत. शहरातील सुमारे नऊ हजार मतदारांसाठी महायुतीची ताकद पणाला लागली आहे. शहरात अनेक अनुभवी नेते आहेत. त्यामुळे महायुतीचा विजय निश्चित आहे. मागील २५ वर्षांपासून पुणे विभाग हा भाजपचा परंपरागत मतदारसंघ राहिला आहे. यंदाही तो मतदारसंघ आपल्याकडे कायम राहील, असा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्या मागे मोठी ताकद आहे. त्यांची स्वत:ची अशी स्वतंत्र ओळख आहे. महिला, सामाजिक, शिक्षण आदी क्षेत्रात त्यांची कामगिरी उत्तुंग आहे. शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांचा पश्चिम महाराष्ट्रात उत्तम जनसंपर्क आहे, असे मोहोळ म्हणाले.

Pune Graduate Teacher Constituency Election
Maval Graduate Teacher Constituency Election: मावळात पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी ३,४९९ मतदार; १२ मतदान केंद्रे सज्ज

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे भारत देशात विद्यापीठ, आयआयटी तसेच, इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांची संख्या वाढली. शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले आहेत. देश सुरक्षित असून, तो खंबीर नेतृत्वाचा हातात असल्याचा विश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. तसेच, मुख्यमंत्री फडणवीस यांनी शिक्षण क्षेत्रात अनेक चांगले निर्णय घेतले आहे. शिक्षक भरती सुरू केली आहे. शिक्षकांची जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत ते सकारात्मक आहेत; मात्र, काँग्रेस व विरोधक ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवत आहेत. त्याला नागरिक कदापि बळी पडणार नाहीत. पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्र्यांचे हात बळकट करण्यासाठी डॉ. स्मिताताई योगेश जाधव व कौस्तुभ गावडे यांना विधान परिषदेवर पाठवणे आवश्यक आहे, असे मोहोळ यांनी स्पष्ट केले.

शहराध्यक्ष बापू काटे म्हणाले की, शहरातील भाजपचे सर्व १४ मंडलाध्यक्ष जीव तोडून प्रचाराचे काम करत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीनंतर महायुती म्हणून आम्ही पहिल्यांदाच व्यासपीठावर एकत्र आलो आहोत. आम्ही एकजुटीने काम करत आहोत. त्यामुळे शहरातील पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही मतदारसंघातून दोन्ही उमेदवारांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊन विजयी करू, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

माजी आमदार विलास लांडे म्हणाले की, निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीमधील आपण सर्व आजी-माजी पदाधिकारी एकत्र आलो आहोत. सर्वांच्या अनुभवातून आणि प्रयत्नातून पदवीधर व शिक्षक या दोन्ही जागांवर आपला निश्चीतच विजय होईल. शिवसेनेचे शहरप्रमुख नीलेश तरस म्हणाले की, शिवसेना तसेच, युवासेना, महिला आघाडी हे निवडणुकीसाठी झटून काम करत आहेत. डॉ. स्मिता योगेश जाधव यांना शिवसेनेचा शंभर टक्के पाठींबा आहे. त्या नक्की विजयी होतील, असा शब्द देतो.

Pune Graduate Teacher Constituency Election
Pune Graduate Constituency Election: पुणे पदवीधर, शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीचा प्रचार जोरात

भारतीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष तथा गटनेते कुणाल वाव्हळकर म्हणाले की, दिल्ली, राज्यात तसेच, महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे विधानपरिषदेच्या या दोन्ही जागांवर आपल्याला जिंकायच्या आहेत. मी स्वत: पदवीधर मतदारसंघाचा मतदार आहे. पक्षाचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाने आम्ही शहरात महायुतीच्या दोन्ही उमेदवारांसाठी काम करत आहोत. विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर म्हणाले की, ही निवडणूक सुशिक्षित मतदारांची आहे. आपल्या पक्षांच्या नेत्यांनी दिलेले आदेश सर्वांना पाळावेत.

डॉ. स्मिताताई योगेश जाधव यांच्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकीय क्षेत्रात नवीन पायाभरणी होत आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चीत आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल म्हणाले की, युवा नेते पार्थ पवार व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदेश दिल्यापासून राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी व नगरसेवक कामाला लागले आहेत. चिंचवड मतदारसंघात आमदार शंकर जगताप यांनी आयोजित केलेल्या मेळाव्यात आम्ही सहभागी झालो होतो. डॉ. स्मिताताई योगेश जाधव या माझ्या लहान बहिणीसमान आहेत. त्यांना जास्तीत जास्त मतदान व्हावे, याकडे सर्वांने लक्ष द्यावे. त्यांचा विजय पक्का आहे. मोरेश्वर शेडगे यांनी सूत्रसंचालन केले. सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी आभार मानले.

पिंपरी-चिंचवड शहरात महायुती एकसंघ

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरात महायुती एक दिलाने काम करत असल्याचे दिसून येत आहे. या मेळाव्यात सर्व घटक पक्षांचे सर्व आजी माजी पदाधिकारी एकत्र आले होते. डॉ. स्मिताताई योगेश जाधव व कौस्तुभ गावडे या दोन्ही उमेदवारांच्या विजयासाठी सर्वांनी शड्डू ठोकले असून, पिंपरी-चिंचवड शहरातून सर्वांधिक मते त्यांना मिळवून देण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकांर्‍यांनी‍ व्यक्त केला.

logo
Pudhari News
pudhari.news