

लोणावळा: मागील चार वर्षांपासून लांबलेली लोणावळा नगर परिषदेची निवडणूक येत्या दोन-तीन महिन्यांत होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याकरिता प्रभागरचना तयार करण्यात आली असून, पुढील महिनाभरात प्रभाग आरक्षणे व नगराध्यक्ष पदाचे आरक्षणदेखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
एकंदरीतच लोणावळा नगर परिषदेची लांबलेली सार्वत्रिक निवडणूक येऊ घातल्याने शहरात राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. जनतेच्या समस्यादेखील राजकीय पक्षांना व इच्छुकांना दिसू लागल्या आहेत. पुढील दोन अडीच महिने मोर्चे, आंदोलने, पत्रकार परिषदा असा सोहळा नागरिकांना अनुभवायला मिळणार आहे. (Latest Pimpri News)
प्रशासकीय राजवटीत समस्या सुटेना
लोणावळा नगर परिषदेची मुदत 2021 साली संपल्यानंतर शहरामध्ये प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकीय राजवटीमध्ये नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, त्या वेळी आपली समस्या कोणाकडे मांडावी? असा प्रश्न नागरिकांना पडला होता.
लोकप्रतिनिधी नगर परिषदेकडे फिरकत नव्हते, तर प्रशासकीय अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित नसायचे. दुय्यम अधिकारीच जनतेच्या प्रश्नांना केराची टोपली दाखवत होते. त्यामुळे नागरिकांना या समस्या सहन करण्याची वेळआली होती.
समस्या सोडविण्यासाठी राजकीय पदाधिकारी सज्ज
आता मात्र, नागरी समस्यांवर आवाज उठवण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवार सक्रिय झाले आहेत. समस्या कोणतीही असो ती सुटू अथवा न सुटू मात्र त्यावर आवाज उठवण्यासाठी आम्ही आता सज्ज आहोत अशा तयारीत ही सर्व इच्छुक मंडळी आहेत. त्यांचे कार्यकर्ते प्रभागात फिरून समस्या शोधून काढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रशासनावर टीका टिपण्णी करताना राजकीय आरोप प्रत्यारोपानेदेखील आता जोर धरायला सुरुवात केली आहे.