

पिंपरी: शहर परिसराला सलग दुसऱ्या दिवशी रविवार (दि. 14) पावसाने झोडपले. रविवारी दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास जोराने बरसलेल्या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरात 35. 5 पावसाची नोंद झाली. सुटीचा दिवस असल्याने रस्त्यांवर वाहनांची वर्दळ कमी होती; मात्र खरेदीनिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांची पावसाने दैना केली.
शनिवारी झालेल्या पावसानंतर रविवारी सकाळी आकाश निरभ्र झाले होते आणि ऊनही पडले होते. मात्र, दुपारी बारानंतर वातावरणात अचानक बदल झाला. त्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. सुमारे दोन तास पावसाचा जोर होता. (Latest Ahilyanagar News)
गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते असल्याने पाण्याचा निचरा न झाल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. चिंचवडगाव येथील बस स्थानकाजवळ पिंपरीकडे येणाऱ्या रस्त्यावरील चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते.
तसेच लिंकरोड एम्पायर इस्टेट येथील रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावरील पाण्यामधून वाट काढताना चारचाकी व दुचाकी गाड्यांमुळे नागरिकांच्या अंगावर पावसाचे साचलेले पाणी अंगावर उडत होते. दुपारनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे रस्त्यावरील पाणी ओसरले.
रविवारी अनेकांना सुट्टी असते; मात्र दुपारी आलेल्या जोराच्या पावसाने खरेदीसाठी घराबाहेर पडणे थोडे मुश्किल झाले होते. रस्त्यावरील पथारी, हातगाडीवाले यांच्या व्यवसायावरदेखील काहीसा परिणाम झाला.
रस्त्यांची दुरवस्था
शहरात पावसाळ्यापूर्वी बुजविलेल्या खड्ड्यांनी जोरदार पावसामुळे पुन्हा डोके वर काढले आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे आणि खडी पसरल्याने वाहनचालकांना वाहने चालविणे मुश्किल होत आहे. पाण्यामुळे खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहने आदळली जातात. तसेच नागरिकांचीदेखील गैरसोय होत आहे.