

वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. दरम्यान, आज याबाबत पत्रकार परिषदेत शिक्कामोर्तब झाले असून, बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेच्या दोन माजी सभापतींसह असंख्य कार्यकर्ते सोमवारी (दि. 15) मुंबई येथे भाजपत प्रवेश करणार असल्याचे ज्येष्ठ नेते सुभाषराव जाधव यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर राष्ट्रवादीला धक्का बसणार असल्याचे बोलले जात आहे. (Latest Pimpri News)
वडगाव मावळ येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर, समाज कल्याण समितीचे माजी सभापती अतिश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष किशोर भेगडे, संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी संचालक सुभाषराव जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन घोटकुले, संतोष मुऱ्हे, खरेदी विक्री संघाचे सभापती शिवाजी असवले, कैलास खांडभोर यांनी संत तुकाराम साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच माजी राज्यमंत्री संजय भेगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सोमवारी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भाजपत प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले.
मावळ विधानसभा निवडणुकीत महायुतीने राष्ट्रवादीचे काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांना अधिकृत उमेदवारी दिली. त्यामुळे उमेदवारीसाठी तीव्र इच्छुक असलेले राष्ट्रवादीचे तत्कालीन प्रदेश उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. दरम्यान, या निवडणुकीत पक्ष विरोधी भूमिका घेऊन अपक्ष उमेदवाराचे काम केल्याने जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी आठ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली होती.
संबंधित निलंबित पदाधिकाऱ्यांसह विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार भेगडे यांना साथ दिलेले अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून भाजपत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या.
यासंदर्भात अनेक गुप्त बैठकाही झाल्या, परंतु हा प्रवेश कधी व कोणाचा होणार याबाबत संभ्रम होता. दरम्यान, आज यावर शिक्कामोर्तब झाले असून, भाजप प्रवेशाला अखेर मुहूर्त सापडला आहे.पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रवादीशी पॅच अप झाल्याची चर्चा आहे. प्रत्यक्ष प्रवेश झाल्यावरच कोणी-कोणी प्रवेश केला हे स्पष्ट होईल.