आळंदी: आळंदी शहराचे इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी एसटीपीला जोडले गेल्याने नदी प्रदूषण मुक्तीसाठीचे पहिले पाऊल पडले आहे. यासाठीचा सुमारे अकरा कोटींचा एसटीपी प्रकल्प उभारण्याचे काम सुरू झाले आहे.
दरम्यान, आळंदीतील सांडपाणी एसटीपी लाइनला जोडण्याचे कामामुळे इंद्रायणी नदी घाटावरील खोदकाम वादाग्रस्त ठरले आहे. याबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सांगितले की, इंद्रायणी नदी प्रदूषण मुक्तीसाठी वारंवार मागणी होत होती. (Latest Pune News)
इंद्रायणी नदीत मिसळणारे सांडपाणी मार्गी लावावे अशी पर्यावरणवादी कार्यकर्ते व वारकर्यांची मागणी होती. आळंदी घाटावर ज्या ठिकाणी हे काम सुरू आहे त्या ठिकाणी सांडपाणी हे थेट नदीत मिसळत होते. त्या ठिकाणी मुख्य ड्रेनेज लाइन टाकून एसटीपीपर्यंत सांडपाणी पाणी घेऊन जाण्यात येत आहे. इ
तर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्याने घाटावरील शासकीय जागेवर थोडेसे खोदकाम करावे लागले, ते अपरिहार्य होते. सदर काम करीत असताना कमीत कमी घाटाचे नुकसान कसे होईल याची काळजी घेतली आहे. तोडलेल्या ठिकाणचे काम पूर्ववत करण्याचे सुरू आहे. सदर घाट पूर्ववत करण्यासाठी नेवासा येथून दगड आणण्यात आले आहेत. घाटाचे पावित्र्य राखण्याचे काम शासन पूर्ण करेल असेही खांडेकर यांनी सांगितले.
असा आहे मलनिस्सारण प्रकल्प
प्रकल्प क्षमता - 4 एमएलडी
अंतर्गत लाइन- 4.50 कि.मी.
मेन लाइन - 300 मी.
निविदा रक्कम - 11 कोटी 51 लाख 19 हजार 211 रुपये.
कार्यान्वयीन यंत्रणा - महाराष्ट्र जीवन प्राधिकरण.