

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दहावीच्या निकालानंतर दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. कमी गुणांच्या नैराश्यामुळे एका विद्यार्थिनीने तर, इतर मित्रांपेक्षा गुण कमी मिळाल्याने मानसिक तणावात असलेल्या एका विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनांनी समाजात चिंता व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांना अपयश स्वीकारण्याची मानसिकता तयार करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
विद्यार्थिनीने घेतला गळफास
सुप्रजा बाबू (16, रा. तनिष्क सोसायटी, चर्होली फाटा) हिने दहावीची परीक्षा दिली होती. निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकालात तिला 39 टक्के गुण मिळाल्याने ती निराश झाली. काही वेळाने तिने घरात गळफास घेत आत्महत्या केली. (Latest Pimpri News)
आईने आवाज दिल्यानंतर प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडण्यात आला. ती गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी दिघी पोलिस तपास करत आहेत.
दहावी, बारावी म्हणजे अंतिम परीक्षा नाहीत
दहावी-बारावी या परीक्षा आयुष्यातील टप्पे आहेत, शेवट नाहीत. अपयश येऊ शकते. मात्र, त्याला सामोरे जाण्यासाठी मानसिक तयारी आणि आधार मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी शाळांनी मानसिक आरोग्य प्रशिक्षण, संवाद आणि समुपदेशन सुविधा सुरू करणे गरजेचे आहे.
मित्रांपेक्षा कमी मार्क; विद्यार्थ्याची आत्महत्या
उमंग लोंढे (16, रा. शिवले कॉलनी, चिंचवड) या विद्यार्थ्याने गुरुवारी सकाळी आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. उमंगने 75 टक्के गुण मिळवले होते. मात्र, त्याचे मित्र 85 ते 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुणांनी उत्तीर्ण झाल्याने तो मानसिक तणावात होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याचे वडील आईला कामावर सोडण्यासाठी गेले असताना उमंगने आत्महत्या केली. वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
दहावीचा निकाल हा मुलांच्या भावी वाटचालीसाठी महत्त्वाचा असतो. मात्र, काही वेळा अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यास विद्यार्थ्यांवर ताण येतो. समाजात यशाचे मोजमाप गुणांवर होत असले तरी, प्रत्येक मुलाची समज, परिस्थिती आणि मानसिक क्षमता वेगळी असते. निकाल फक्त टक्केवारी सांगतो, मूल्यांकन नव्हे. जीवनाचे मोल गुणांपेक्षा कितीतरी अधिक आहे.
- डॉ. पूजा मिसाळ, मानसोपचारतज्ज्ञ
पालक, शिक्षक आणि समाज यांनी यशासाठी प्रेरणा देताना अपयशालाही सामोरे जाण्याची ताकद मुलांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. निकालाचा दिवस हा संवादाचा दिवस असावा. मात्र, आपण तो निकालाचे रणांगण बनवतो.
- प्रा. सुनील गव्हाणे, शिक्षणतज्ज्ञ
मुलांवर सोशल मीडियाच्या प्रभावामुळे सतत दबाव असतो. फर्स्ट रँक, गोल्ड मेडल्स यासारख्या गोष्टींचा आभासी प्रभाव खर्या आत्ममूल्यांवर परिणाम करतो. मुलांच्या यशात सहभागी होण्याइतकेच त्यांच्या अपयशातही साथ देणे महत्त्वाचे आहे.
- विक्रम बनसोडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक