

पिंपरी: रस्त्यांचे रुंदीकरण आणि काँक्रीटीकरणाच्या कामासाठी बनावट कार्यपूर्ण प्रमाणपत्रे सादर करून पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची (पीएमआरडीए) फसवणूक करण्यात आली. हा प्रकार १७ ते ३१ डिसेंबर २०२५ दरम्यान पीएमआरडीएच्या आकुर्डी येथील कार्यालयात घडला.
याप्रकरणी पीएमआरडीएच्या अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता ज्ञानोबा चौरे यांनी निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मेसर्स एसपीडी इन्फ्रा प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक शहाजी पांडुरंग देवकर (रा. पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे मजाक इंडिया पिंपळे जगताप ते करंदी फाटा जोडणारा रस्ता आणि सणसवाडी ते पिंपळे जगताप या रस्त्यांच्या कामांच्या निविदाप्रक्रियेत आरोपीने बदलापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या सही-शिक्क्यांची तीन बनावट कार्यपूर्ण प्रमाणपत्रे तयार केली.
मूळ रकमेत फेरफार करून ही प्रमाणपत्रे खरी असल्याचे भासवत ऑनलाइन निविदा प्रक्रियेत वापरून पीएमआरडीए कार्यालयाची फसवणूक केली. निगडी पोलिस तपास करीत आहेत.