

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोतील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील अनधिकृत प्रशासकीय इमारत कोसळून नऊ कर्मचार्यांचा नाहक बळी गेला. त्या दुर्घटनेला दीड महिना उलटून गेला आहे. मात्र, प्रशासनाकडून केवळ आर्थिक मदतीची घोषणा करून आणि संबंधित कंपनीच्या दोन अधिकार्यांवर गुन्हा दाखल करून प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ती दुर्घटना नक्की का झाली, अनधिकृत इमारतीला परवानगी कोणी दिली, या प्रकल्पात छुपे भागीदार कोण आहेत, त्यांच्यापर्यंत पोहचण्याचा साधा प्रयत्नही होताना दिसत नाही.
मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील एकाही दोषीला सोडणार असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री गिरीश महाजन यांनी दिली होती. मात्र, अॅन्टोनी लारा रिन्यूव्हेबल एनर्जी प्रा. लि. कंपनीच्या दोन अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्यापलीकडे महापालिका प्रशासनाने काहीही केले नाही. तर, ज्या अधिकार्यांना कायमचे बडतर्फ करायला हवे, त्या अधिकार्यांना जुजबी निलंबनाची कारवाई केल्याचे आरोप विरोधक सातत्याने करत आहेत.
या दुर्घटनेत मृत कर्मचार्यांचे नऊ कुटुंब उघड्यावर पडली. त्यानंतर एका कर्मचार्याच्या पतीने आत्महत्या केली. या सर्व गोष्टीवर पैसा हा न्याय होऊ शकत नाही. या प्रकरणात कंपनीचा मालक, भागीदार यांची माहिती प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. तळमजल्याची बांधकाम परवानगी असताना दोन मजली इमारत कशी बांधली, एवढ्या मोठ्या बांधकाम परवानगीसाठी कोणी दबाव टाकत होते का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान, मृतांच्या नातेवाईकांना महापालिकेकडून 10 लाख, कंपनीकडून 40 लाख आणि राज्य शासनाकडून 5 लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली. एका राजकीय नेत्याचा दबाव असल्याने महापालिकेने 10 लाखांची मदत तातडीने दिल्याची चर्चा आहे. मात्र, कंपनीने अद्यापही आपल्या हिश्श्याची मदत दिलेली नाही. राजकीय नेत्याच्या कुटुंबातील सदस्य, पुण्यातील एका बड्या राजकीय नेत्याचा मुलगा आणि महापालिकेतील एका अधिकार्याची पत्नी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पात छुपे भागीदार असल्याची चर्चा आहे. मात्र, प्रशासनाने या मंडळींची नावे पुढे येऊ दिली नाही. केवळ आर्थिक मदतीची घोषणा करून हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.
दुर्घटनेप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरूच
मोशी कचरा डेपो दुर्घटनेप्रकरणी अशोककुमार सियाराम शरण गुप्ता (वय 59), सेफ्टी ऑफिसर विजय रामराव सपकाळ (वय 38) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. गुप्ता यांना अटक केली असून, सपकाळ यांच्यावर अद्यापही उपचार सुरू आहे. या प्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणे आवश्यक
मोशी कचरा डेपो दुर्घटनेचा चौकशीसाठी राज्य शासनाची समिती नेमण्यात आली आहे. कचरा डेपो येथे अनेक नियम पायदळी तुडवत कामकाज सुरू असल्याचे सिद्ध झाले आहे. सध्या कागदावर जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली आहे. या प्रकरणी समितीने वेगाने कामकाज करून घटनेला जबाबदार असणार्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे, असे शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) नगरसेविका सुलभा उबाळे यांनी सांगितले.