Pimpri Chinchwad Police Diabetes: 'खाकी'ला आजारांचा विळखा! पिंपरी-चिंचवड पोलिस दलातील 250 हून अधिक जणांना मधुमेह

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी आणि अंमलदारांपैकी २५० हून अधिक जण मधुमेहाशी झुंज देत आहेत.
Pimpri Chinchwad Police Diabetes
Pimpri Chinchwad Police DiabetesPudhari
Published on
Updated on

पिंपरी: नागरिकांच्या सुरक्षेसाठी अहोरात्र रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांच्या आरोग्यालाच आता आजारांचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील अधिकारी आणि अंमलदारांपैकी २५० हून अधिक जण मधुमेहाशी झुंज देत आहेत.

मधुमेहाव्यतिरिक्त उच्च रक्तदाब (बीपी), कॅन्सर आणि अन्य आजारांवर उपचार घेणाऱ्या पोलिसांची संख्या स्वतंत्र आहे. अनियमित आहार, कामाचा ताण, दीर्घकाळ चालणारे बंदोबस्त आणि बदलत्या वेळेतील ड्युटी यामुळे 'खाकी'पुढे स्वतःचे आरोग्य सांभाळण्याचेही मोठे आव्हान उभे राहिले आहे.

शहराची वाढती लोकसंख्या, गुन्हेगारी नियंत्रण, वाहतूक नियमन, मोर्चे, आंदोलने, सण-उत्सव, निवडणुका, व्हीआयपी दौरे आणि अचानक उद्भवणाऱ्या कायदा-सुव्यवस्थेच्या प्रसंगांमुळे पोलिसांच्या कामाचे तास ठरलेले नसतात. अनेकदा जेवणाची ठरलेली वेळ चुकते. रात्रीच्या ड्युटीनंतर लगेच दुसऱ्या जबाबदारीला सामोरे जावे लागते.

सलग बंदोबस्तामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती मिळण्यातही अडचणी निर्माण होत असल्याचे पोलिस खासगीत सांगतात. रात्रपाळी आणि सातत्याने बदलत्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्यांमध्ये टाइप-२ मधुमेहाचा धोका वाढू शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामाच्या स्वरूपाचा विचार करता योग्य आहार, पुरेशी झोप, नियमित शारीरिक हालचाल आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी यांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

Pimpri Chinchwad Police Diabetes
Pimpri Chinchwad Fire Department: पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागात २१३ पदे रिक्त; १८ पैकी केवळ १० केंद्रे सुरू

अडीचशेचा आकडा देतोय इशारा

पोलिस आयुक्तालयाचे मनुष्यबळ सुमारे साडेचार हजार आहे. त्यापैकी केवळ मधुमेह असलेल्या पोलिसांची संख्या अडीचशेपेक्षा अधिक आहे. म्हणजेच एकाच आजाराने पोलिस दलातील मोठा घटक प्रभावित झाला आहे. त्यात बीपी, कॅन्सर आणि अन्य आजारांच्या रुग्णांचा समावेश नाही. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच नियमित तपासणीद्वारे संभाव्य धोका वेळेत ओळखण्याची गरज अधोरेखित होत आहे.

बंदोबस्तात जे मिळेल ती खाण्याची वेळ

पोलिसांच्या कामाचे स्वरूप पाहता अनेकदा घरचा नियमित आहार घेणे शक्य होत नाही. बंदोबस्ताच्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या खाद्यपदार्थांवर अवलंबून राहावे लागते. जेवणाच्या वेळांमध्ये मोठे अंतर पडणे, रात्री उशिरा जेवण होणे किंवा ड्युटीच्या धावपळीत आहाराचे नियोजन कोलमडणे अशा अडचणी सातत्याने समोर येतात. त्यामुळे दीर्घ बंदोबस्ताच्या ठिकाणी आरोग्यदायी आहाराच्या पर्यायांचाही विचार होण्याची गरज आहे.

Pimpri Chinchwad Police Diabetes
Moshi Garbage Depot Accident: मोशी कचरा डेपो दुर्घटनेचे गूढ कायम; प्रशासनाकडून प्रकरण मिटविण्याचा खटाटोप?

मधुमेहाकडे केवळ 'शुगर' म्हणून पाहू नका

मधुमेह हा केवळ रक्तातील साखर वाढण्यापुरता मर्यादित आजार नाही. दीर्घकाळ मधुमेह नियंत्रणात न राहिल्यास हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, मूत्रपिंड आणि मज्जासंस्थेशी संबंधित गुंतागुंत होऊ शकते. त्यामुळे रक्तातील साखरेसोबतच रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवर नियंत्रण ठेवणे, तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डोळे, मूत्रपिंड आणि पायांची तपासणी करणेही महत्त्वाचे असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

'दीक्षित डायट'च्या माध्यमातून जागृती

पोलिसांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच 'दीक्षित डायट' या विषयावर माहितीपूर्ण कार्यक्रम घेण्यात आला. आहाराच्या सवयी आणि आरोग्याची निगा याबाबत अधिकारी व अंमलदारांना मार्गदर्शन करण्यात आले. व्यस्त दिनक्रमातही आरोग्यासाठी स्वतंत्र वेळ देणे आणि शिस्तबद्ध आहाराचे महत्त्व पटवून देण्याच्यादृष्टीने हा उपक्रम राबविण्यात आला होता.

'हेल्थ रोस्टर'चीही गरज

ड्युटी रोस्टरप्रमाणे पोलिसांच्या आरोग्याकडेही नियोजनबद्ध पद्धतीने पाहण्याची गरज वाढत्या आकडेवारीतून पुढे येत आहे. नियमित आरोग्य तपासणी, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब आढळलेल्या कर्मचाऱ्यांचा वैद्यकीय फॉलोअप आणि ड्युटीदरम्यान आरोग्यदायी आहाराची उपलब्धता अशा बाबींना व्यापक स्वरूप देता येऊ शकते. विशेषतः दीर्घ बंदोबस्ताच्या काळात मधुमेह असलेल्या कर्मचाऱ्यांच्या औषध आणि आहाराच्या वेळांकडे लक्ष देणारी स्वतंत्र व्यवस्था उपयुक्त ठरू शकते.

पोलिसांनी अशी घ्यावी काळजी..

  • औषधांच्या वेळा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बदलू नयेत

  • दीर्घ बंदोबस्ताला जाताना आवश्यक औषधे आणि योग्य खाद्यपदार्थ सोबत ठेवावेत

  • रक्तातील साखरेची डॉक्टरांनी सांगितलेल्या वेळापत्रकानुसार नियमित तपासणी करावी

  • साखरयुक्त पेये आणि अतिप्रक्रिया केलेले पदार्थ टाळावेत

  • जास्त साखर, मीठ आणि अस्वास्थ्यकर चरबी असलेले पदार्थ मर्यादित ठेवावेत

  • नियमित शारीरिक हालचाल आणि व्यायाम करावा

  • शक्य तितकी पुरेशी झोप घ्यावी

  • तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थ टाळावेत

  • मधुमेहासोबत रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलवरही नियंत्रण ठेवावे

  • अचानक घाम येणे, कंप, चक्कर, अशक्तपणा किंवा गोंधळ जाणवल्यास रक्तातील साखर कमी झाल्याची शक्यता लक्षात घ्यावी

तंदुरुस्त असूनही जीवनशैलीचा फटका

पोलिस भरतीपासूनच शारीरिक तंदुरुस्तीला महत्त्व असते. मात्र, सेवेत आल्यानंतर कामाचा ताण आणि अनिश्चित वेळापत्रकामुळे नियमित व्यायामासाठी स्वतंत्र वेळ काढणे अनेकांना कठीण जाते. काहींच्या ड्युटीमध्ये सतत धावपळ असते. तर, काहींना बंदोबस्त किंवा कार्यालयीन कामात दीर्घकाळ एकाच ठिकाणी राहावे लागते. त्यामुळे केवळ ड्युटीवरील हालचाल म्हणजे नियमित व्यायाम असे मानून चालत नाही. निरोगी आहार, नियमित शारीरिक हालचाल, योग्य वजन आणि तंबाखूसह इतर व्यसनांपासून दूर राहणे हे टाइप-२ मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत.

पोलिसांचे काम इतर नोकऱ्यांच्या तुलनेत वेगळे आहे. बंदोबस्त, रात्रीची ड्युटी आणि अचानक येणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे आहार व विश्रांतीच्या वेळा बदलतात. त्यामुळे अधिकारी-अंमलदारांनी स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. आरोग्य तपासणी आणि प्रतिबंधात्मक उपायांवर पुढेही भर देण्यात येईल.

- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

मधुमेह असलेल्या व्यक्तीने केवळ साखरेचा आकडा कमी करण्यावर लक्ष केंद्रित न करता संपूर्ण जीवनशैलीकडे पाहणे आवश्यक आहे. अनियमित ड्युटी असली तरी औषधे स्वतःहून बंद करणे किंवा त्यांच्या वेळा बदलणे योग्य नाही. नियमित तपासणी, योग्य आहार, शारीरिक हालचाल आणि पुरेशी झोप याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

- डॉ. सुहास काशीद, मुख्य वैद्यकीय अधिकारी, पोलिस रुग्णालय, पिंपरी-चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news