

पिंपरी: पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) विविध प्रकल्पासाठी 43 हजार कोटी रुपये खर्चाच्या 204 प्रकल्पांचे जाळे विणले असून, यामुळे पुण्याच्या विकासाची दिशा आणि दशा दोन्ही बदलणार असल्याचा विश्वास पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी व्यक्त केला. ‘पीएमआरडीए’च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा सविस्तर आढावा सादर केला.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांच्या सीमा ओलांडून विस्तारणाऱ्या या महानगराचा विचार केवळ आजचा नाही, तर पुढील 50 वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन करण्यात आला आहे. दळणवळण, सार्वजनिक वाहतूक, पर्यावरण रक्षण आणि शिस्तबद्ध गृहनिर्माण या चतु:सूत्रीवर भर देण्यात आला आहे.
पुणे महानगरातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी ‘इनर रिंग रोड’ हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. तो सध्या नियोजनाच्या स्तरावर आहे. 589 किलो मीटर लांबीचे 96 रस्ते प्रकल्प प्रगतीपथावर असून त्यासाठी 18,697 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यात औद्योगिक कनेक्टिव्हिटी (60 कि.मी.), विमानतळ जोडणी (61 कि.मी.) आणि चाकण व हिंजवडी भागातील वाहतूककोंडी फोडण्यासाठी विशेष ‘डिक्लॉगिंग’ रस्त्यांचा समावेश आहे.
पर्यटनाच्या दृष्टीने लोणावळ्यातील टायगर व लायन्स पॉईंट येथे 822 कोटी रुपये खर्चाचा स्कायवॉक प्रकल्प ’पीपीपी’ तत्त्वावर साकारला जात असून, पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्रासाठी 982 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
विशेषतः वाघोली परिसरातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी 23 कोटींची योजना पूर्णत्वाकडे असून ती हस्तांतरणाच्या स्थितीत आहे. तर, इंद्रायणी, पवना आणि मुळा-मुठा नद्यांमधील प्रदूषण रोखण्यासाठी 1,967 कोटींचे 3 प्रकल्प निविदा स्तरावर आहेत. तसेच 335 किलोमीटर सांडपाणी वाहिन्यांच्या जाळ्यासाठी 1,209 कोटींचे नियोजन असल्याचे डॉ. म्हसे यांनी सांगितले.