

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आणखी नऊ ठिकाणी पंतप्रधान आवास योजना राबविली जाणार आहे. या योजनेद्वारे साडेसहा हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील तब्बल साडेसहा हजार कुटुंबांना पक्के व हक्काचे घर मिळणार आहे. (pcmc Latest News)
महापालिकेने पंतप्रधान आवास योजनेत मोशीतील बोर्हाडेवाडी, चर्होली, पिंपरीतील उद्यमनगर, आकुर्डीतील मोहननगर येथे गृहप्रकल्प उभारला आहे. तेथे एकूण 3 हजार 668 सदनिका आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्ल्यूएस) कुटुंबांना देण्यात आल्या आहेत. तर, डुडुळगाव येथील 1 हजार 190 सदनिकेचा गृहप्रकल्पांच्या इमारत बांधकाम सुरू आहे. न्यायालयात वाद गेल्याने जागा ताब्यात न आल्याने रावेत येथील 934 सदनिकांचा गृहप्रकल्प रद्द करण्यात आला आहे. तेथील लाभार्थ्यांना किवळे येथे सदनिका देण्याची प्रक्रिया सुरू आहे. (Pcmc Latest News)
रावेत येथील रद्द झालेला गृहप्रकल्प पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. तसेच, मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी, ताथवडे, रावेत आणि चोविसावाडी असे एकूण नऊ ठिकाणी महापालिकेच्या वतीने दुसर्या टप्प्यात ही योजना राबविण्यात येत आहे. महापालिकेने सुधारित विकास योजना आराखड्यात (डीपी प्लान) या आठ ठिकाणच्या जागा आरक्षित केल्या आहेत. त्यापैकी मामुर्डी, पुनावळे, वाकड, दिघी, वडमुखवाडी व रावेत या सहा ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सदनिका असणार आहेत. तर, उर्वरित रावेत, ताथवडे, चोविसावाडी या ती ठिकाणी एचडीएच गटासाठी (बेघरांसाठी घरे) गृहप्रकल्प आहे. रावेत येथे जुना तसेच, नवा असे दोन गृहप्रकल्प होणार आहेत.
या नऊ गृहप्रकल्पांत साडेसहा हजार सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील कुटुंबांना आपल्या सोयीस्कर ठिकाणी परवडणार्या दरात सदनिका घेता येणार आहेत. त्यासाठी आणखी किमान तीन ते पाच वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तसेच, शहरात म्हाडासाठी आणखी काही ठिकाणी जागा आरक्षित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे परवडणार्या दरातील आणखी गृहप्रकल्प शहरात तयार होतील, असा दावा पालिकेच्या अधिकार्यांनी केला आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस होय. पंतप्रधान आवास योजनेत दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरातील ईडब्ल्यूएस वर्गासाठी पूर्वी 3 लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा होती. ती आता वाढवून 6 लाख रुपये करण्यात आली आहे. आता सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या कुटुंबांना पंतप्रधान आवास योजनेत सदनिका खरेदी करता येईल; तसेच, पूर्वी 30 चौरस मीटर (323 चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या (कार्पेट एरिया) सदनिका होत्या. आता त्या 45 चौरस मीटर (484 चौरस फूट) चटई क्षेत्रफळाच्या सदनिका असणार आहेत. शहरातील झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान आवास योजनेच्या टप्पा दोनमध्ये शहरातील जास्तीतजास्त कुटुंबांना लाभ मिळवून देण्यात येणार आहे. वाढवलेली उत्पन्न मर्यादा, घराच्या किमान कार्पेट क्षेत्रफळामध्ये वाढ व झोपडपट्टीवासीयांचा समावेशामुळे शहरातील हजारो नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या नवीन निकषांनुसार आगामी गृहप्रकल्पांचे काम पूर्ण झाल्यानंतर सदनिकांचे लाभार्थ्यांना वाटप केले जाईल, असे महापालिकेचे आयक्क्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी सांगितले.
गृहप्रकल्प उभारण्याची कार्यवाही सुरू
शहरातील या नऊ ठिकाणच्या जागेवर पंतप्रधान आवास योजनेत गृहप्रकल्प राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी त्या जागा ताब्यात घेऊन भूसंपादनाची कार्यवाही पूर्ण करण्याबाबत नगर रचना विभागास सूचित करण्यात आले आहे. जागा ताब्यात आल्यानंतर त्या केंद्र व राज्य शासनाची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. त्यानंतर गृहप्रकल्पासाठी इमारत उभारणीचे काम सुरू केले जाईल, असे महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.
ठिकाण-प्रयोजन-क्षेत्र (हेक्टरमध्ये)
मामुर्डी-ईडब्ल्यूएस-1.44
पुनावळे-ईडब्ल्यूएस-2.00
वाकड-ईडब्ल्यूएस-2.00
दिघी-ईडब्ल्यूएस-1.14
वडमुखवाडी-ईडब्ल्यूएस-2.00
रावेत-ईडब्ल्यूएस-2.00
रावेत-एचडीएच-2.00
ताथवडे-एचडीएच-4.10
चोविसावाडी-एचडीएच-3.59