

नाशिकरोड: जयभवानी रोड, लोणकर मळा व परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार दिसून येत असून भरवस्तीत बिबटे फिरत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात आतापर्यंत चार बिबटे पिंजऱ्यात पकडण्यात यश आले असून, अजूनही बिबट्याचा वावर या परिसरात आहे.
काल (दि. ४) मध्यरात्री सव्वा एकच्या सुमारास लोणकर मळा भागात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. रहिवाशांनी मनसे शहर उपाध्यक्ष अॅड. नितीन पंडित यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा ठेवण्याची मागणी केली.
या घटनेनंतर मनोहर गार्डन, चव्हाण मळा या ठिकाणी पिंजरे ठेवण्यात आले आहेत. या परिसराला आर्मी कॅम्प लागून असल्याने अनेक ठिकाणी कंपाउंडच नसल्याने बिबट्यांना नागरी वस्तीमध्ये प्रवेश करणे सोपे जात आहे. या भागात लोणकर मळा, जाचक मळा, विहीतगाव, वडनेर, लहवित येथे शेती, नदी, व दाट झाडीमुळे बिबट्यांचे वास्तव्य वाढत आहे. लोणकर मळ्यात गेल्या सहा दिवसांमध्ये बिबट्याने चौथ्यांदा दर्शन दिले आहे. काही दिवसांपूर्वी जाचक मळा भागात लष्करी हद्दीतील बाभळीच्या झाडावर झोपलेल्या बिबट्याला नागरिकांनी फटाके फोडून पळवले होते.
भरदिवसा बिबटे नागरी वस्तीमध्ये येऊ लागल्याने शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार वर्गामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. बिबट्यांचा धोका लक्षात घेता वनविभागाने सतर्क राहून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी अॅड. नितीन पंडित यांनी केली आहे.