Body Worn Cameras: वाहतूक पोलिसांचे कामकाज आता ‘ऑन कॅमेरा’; पिंपरी-चिंचवड पोलिसांना ३५० बॉडी वॉर्न कॅमेरे

वाहनचालक आणि पोलिसांमधील वादांना बसणार आळा; कारवाईतील पारदर्शकता वाढणार, गैरवर्तनाच्या तक्रारींची होणार पडताळणी
Police Body Worn Cameras
Police Body Worn CamerasPudhari
Published on: 
Updated on: 

संतोष शिंदे

पिंपरी: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करताना होणारे वाद, गैरवर्तनाचे आरोप आणि दंडावरून निर्माण होणाऱ्या तक्रारींना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरली आहे. पोलिस दलाला ३५० बॉडी वॉर्न कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले असून, वाहतूक नियमनादरम्यानही त्यांचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांचा कारभार आता 'ऑन कॅमेरा' येणार आहे. या कॅमेऱ्यांमुळे कारवाईतील पारदर्शकता वाढण्याबरोबरच पोलिस आणि वाहनचालक यांच्यातील वादग्रस्त घटनांचे दृश्य पुरावे उपलब्ध होणार आहेत.

Police Body Worn Cameras
Pimpri Chinchwad Diwali Garbage: पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या सात दिवसांत ९,६९५ टन कचरा जमा

शहरातील प्रमुख चौक, सिग्नल आणि वर्दळीच्या रस्त्यांवर वाहतूक पोलिसांना दररोज विविध प्रकारच्या परिस्थितीला सामोरे जावे लागते. हेल्मेट न वापरणे, सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविणे किंवा मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करताना अनेकदा शाब्दिक चकमकी घडतात. काही वाहनचालक पोलिसांवर अरेरावी किंवा पैशांची मागणी केल्याचे आरोप करतात. दुसरीकडे, पोलिसांनाही शिवीगाळ, धमक्या आणि धक्काबुक्कीला सामोरे जावे लागते. अशा घटनांमध्ये नेमके काय घडले, याची खातरजमा करणे अनेकदा कठीण होते. बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांमुळे या परिस्थितीत बदल होणार आहे.

Police Body Worn Cameras
Pimpri Chinchwad Nominated Corporators: पिंपरी-चिंचवडमध्ये स्वीकृत नगरसेवक निवडीचा मुहूर्त कधी? भाजपचे ७, राष्ट्रवादीचे ३ नगरसेवक ठरणार

बॉडी वॉर्न कॅमेरा हे गणवेशाच्या छातीवर बसविण्यात येणारे छोटे डिजिटल उपकरण आहे. कॅमेरा सुरू केल्यानंतर समोरील दृश्यांचे चित्रीकरण होते. त्यामध्ये मायक्रोफोनची सुविधा असल्याने संभाषणाचा आवाजही रेकॉर्ड होतो. वाहनचालकाला थांबविण्यापासून त्याच्यावर कारवाई करण्यापर्यंतच्या प्रक्रियेची नोंद यामध्ये केली जाणार आहे. काही मॉडेलमध्ये रात्रीच्या वेळी चित्रीकरण, जीपीएस आणि थेट नियंत्रण कक्षाशी जोडणी अशा सुविधाही आहेत.

या यंत्रणेचा महत्त्वाचा फायदा म्हणजे तक्रारींची वस्तुनिष्ठ पडताळणी केली जाणार आहे. एखाद्या वाहनचालकाने पोलिसांवर गैरवर्तनाचा आरोप केल्यास संबंधित चित्रफीत तपासता येईल. त्याचप्रमाणे प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यावर खोटा आरोप झाल्यास त्यालाही पुराव्याचा आधार मिळू शकेल. कारवाईचे चित्रीकरण होत असल्याची जाणीव असल्याने पोलीस आणि नागरिक दोघांकडूनही अधिक संयमी वर्तन राहणार आहे. लाचखोरीच्या आरोपांच्या चौकशीसाठीही उपलब्ध चित्रफिती उपयुक्त ठरणार आहेत.

Police Body Worn Cameras
Lonavala Hawkers Protest: लोणावळ्यात टपरीधारकांच्या कारवाईविरोधात सर्वपक्षीय आंदोलन; पुनर्वसनानंतरच कारवाईची मागणी

वाहतूक नियमनाबरोबरच अपघातस्थळी वाहनांची स्थिती, रस्त्यावरील परिस्थिती आणि जमलेल्या गर्दीचे चित्रीकरण करण्यासाठीही या कॅमेऱ्यांचा उपयोग होऊ शकतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही उपलब्ध रेकॉर्डिंगच्या आधारे कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचे परीक्षण करणे शक्य होणार आहे.

प्रभावी नियंत्रणाची गरज

बॉडी वॉर्न कॅमेऱ्यांची परिणामकारकता त्यांच्या प्रत्यक्ष वापरावर अवलंबून राहणार आहे. कर्तव्यादरम्यान कॅमेरा कधी सुरू ठेवायचा, चित्रफीत किती काळ जतन करायची, तिचा वापर कोण करू शकणार आणि तक्रारीच्या वेळी ती कशी उपलब्ध करून द्यायची, याबाबत स्पष्ट नियम आवश्यक आहेत. त्यामुळे केवळ कॅमेरे उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांच्या वापरावर प्रभावी नियंत्रणही वरिष्ठ अधिकाऱ्यांना ठेवावे लागणार आहे.

Police Body Worn Cameras
Diwali Faral Abroad: आईच्या हातच्या फराळाचा सुगंध सातासमुद्रापार! पिंपरीतून ४०० किलो फराळ परदेशात रवाना

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३५० कॅमेऱ्यांचे लोकार्पण

पिंपरी-चिंचवड पोलिस दलाच्या आधुनिकीकरणासाठी ३ नोव्हेंबर रोजी आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात विशेष कार्यक्रम पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ३५० बॉडी वॉर्न कॅमेरे, चार ड्रोन आणि ६५ नवीन पोलिस वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. याच कार्यक्रमात स्वतंत्र पोलिस मुख्यालयाच्या जागेचे हस्तांतरण, पिंपरी पोलिस संकुलाचे भूमिपूजन आणि सीसीटीव्ही-आयटीएमएस प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला.

वाहतूक नियमन करताना पारदर्शकता आणि शिस्त राखण्यासाठी बॉडी वॉर्न कॅमेरे उपयुक्त ठरणार आहेत. वाहनचालक आणि वाहतूक पोलिसांमधील संवादाचे चित्रीकरण होणार असल्याने गैरसमज, वादविवाद तसेच गैरवर्तनाच्या तक्रारींची पडताळणी करणे सोपे होईल. वाहतूक नियमांची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्याबरोबरच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढविण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल.

विक्रांत देशमुख, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी- चिंचवड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.