

Shiv Sena Shinde Group Leader Balasaheb Chandere Firing Case
पिंपरी : जमिनीच्या वादातून शिवसेनेचे (शिंदे गट) जिल्हाप्रमुख बाळासाहेब चांदेरे याच्याकडून पिस्तुलातून गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी (दि. २) पहाटे सुस-नांदे रोडवरील बांधकाम साईटवर घडला. या प्रकारामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या प्रकरणी बावधन पोलिसांनी चांदेरे यांच्यासह एका साथीदाराला ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. जमिनीच्या वादातून झालेल्या या गोळीबारामुळे शहराच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नागेश मोहन राठोड (२१, रा. नऱ्हे) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, बाळासाहेब चांदेरे (रा. सुसगाव) आणि संदेश माने (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश राठोड रात्री राहुल प्रेम सरकार, मेहबूब हबीब शेख, विकास विजय पानसरे, वरद भोसले आणि कुणाल चाटे यांच्यासमवेत भूमकर ब्रिज परिसरात भेटले होते. त्यावेळी राहुल सरकार यांनी आपण सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असलेल्या सुसगाव येथील बांधकाम साईटवर लक्ष ठेवण्यासाठी जाण्यास सांगितले. त्यानंतर नागेश, राहुल आणि मेहबूब यांना यश जगताप व आदित्य मारणे यांनी स्कॉर्पिओमधून ओम पॅराडाईज बिल्डिंगसमोरील बांधकाम साईटवर सोडले. तेथे तिघे काही वेळ गप्पा मारत बसले होते.
दरम्यान, तिघे बांधकाम साईटबाहेर आले असता समोर पांढऱ्या रंगाची फॉर्च्युनर कार येऊन थांबली. त्यातून आरोपी चांदेरे खाली उतरून बांधकाम साईटसमोर आला. त्यावेळी संबंधित जमिनीच्या वादातून दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर चांदेरे याने राहुल सरकार यांच्या कानशिलात मारली. त्यानंतर राहुल सरकार यांनीही प्रतिकार करत चांदेरे याच्या कानशिलात लगावली.
त्यानंतर चांदेरे याने पँटच्या बाजूला हात घालून काळ्या रंगाचे पिस्तूल बाहेर काढले. दरम्यान, आणखी एक व्यक्ती दुचाकीवर तेथे आली आणि शिवीगाळ व दमदाटी करू लागली. समोर पिस्तूल पाहताच नागेश राठोड, राहुल सरकार आणि मेहबूब शेख यांनी जीवाच्या भीतीने पळ काढला. राहुल आणि मेहबूब हे स्मशानभूमीच्या दिशेने, तर नागेश राठोड महामार्गाच्या दिशेने धावले. काही अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक गोळी झाडल्याचा आवाज ऐकू आला.
घटनेची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आरोपींकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी मारहाण, शिवीगाळ, धमकी, लोकांच्या जीवितास धोका निर्माण करणे, शस्त्र कायद्याचे उल्लंघन तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक बालाजी ठाकूर तपास करीत आहेत.
गोळीबाराचा आवाज ऐकताच नागेश राठोड, राहुल सरकार आणि मेहबूब शेख यांनी जीव वाचवण्यासाठी सुसगाव स्मशानभूमीजवळील ओढ्यातून पळ काढला. त्यावेळी मेहबूब शेख यांनी डायल ११२ वर संपर्क साधून गोळीबाराची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नागेश राठोड यांनी मित्र वरद भोसले याला फोन करून बोलावले. सुमारे १५ ते २० मिनिटांनी तो कार घेऊन स्मशानभूमीजवळ आला. त्यानंतर तिघे चांदणी चौक येथे गेले. तेथून तेजस जडीतकर याला संपर्क करण्यात आला. तेजस जडीतकर व अमित वर्मा तेथे आल्यानंतर सर्वजण बावधन पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.
बावधन, सुसगाव आणि परिसरात गेल्या काही वर्षांत जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यातून मालकी हक्क, ताबा आणि विकासकामांवरून वादाच्या घटनाही वाढत आहेत. अशा परिस्थितीत एका प्रमुख राजकीय पदाधिकाऱ्याचे नाव थेट गोळीबाराच्या गुन्ह्यात समोर आल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणामागील जमीन वादाचे नेमके स्वरूप आणि गोळीबारामागील कारणांचा पोलीस तपास करीत आहेत.
गुरुवारी रात्री एकच्या सुमारास बाळासाहेब चांदेरे याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली. पोलिसांना माहिती कळताच तातडीने चांदेरे आणि त्यांचा सहकारी माने याला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
- अरविंद पवार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, बावधन पोलिस ठाणे.