

पिंपरी: महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून प्रत्येक प्रभागामधील दुकाने, हातगाड्या, हॉटेल्स यावर प्लास्टिक पिशव्या व वस्तू वापराबाबत कारवाई केली जाते; मात्र असे अजूनही हॉटेल्समध्ये पॅकेजिंगसाठी वापरले जाणारे प्लॅस्टिक पाऊच, पिशव्या, भांडी आदींचा सर्रास वापर सुरू आहे. महापालिकेच्या पर्यावरण अहवालातदेखील शहरातील कचर्यात प्लास्टिकचा 28.49 टक्के समावेश आहे.
बाजारपेठेत बंदी घातलेल्या अनेक वस्तुंची बिनदिक्कतपणे विक्री केली जाते. हॉटेल व्यावसायिक देखील पार्सलसाठी प्लास्टिक पिशव्यांचा वापर करताना दिसतात. महापालिकेच्या पर्यावरण अहवालानुसार शहरातील कचर्यातून 4.5 ते 5 टन प्रतिदिन प्लास्टिकवर प्रक्रिया होते. प्लास्टिक कचर्यापासून प्रतिदिन 5 टन इंधननिर्मिती केली जात आहे. (Latest Pimpri News)
शहरामध्ये 23 जून 2018 पासून प्लास्टिक बंदची कारवाई करण्यास सुरू केली. त्यापूर्वी नागरिकांमध्ये प्लास्टिक वापरणार्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाईल, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. दंडाच्या भीतीने सर्वसामान्य नागरिकांनी कापडी पिशव्या वापरण्यास सुरुवात केली.
रस्त्याने जाणार्या एखाद्या व्यक्तीच्या हातात जरी प्लास्टिक पिशवी, कॅरीबॅग दिसली तरी त्याला दंड केला जात होता. दुकाने, हातगाड्या, पथारीवाले यांच्याकडे प्लास्टिक कॅरीबॅग वापरली जाते का? याची पाहणी दररोज केली जात होती.
मात्र, नंतर हळूहळू पालिकेच्या आरोग्य विभागाची प्लास्टिक बंदीवरील कारवाई मंदावली आहे. बाजारपेठेत प्लास्टिकचा सरासपणे वापर होताना दिसत आहे. नागरिकांही बिनदिक्कतपणे हातात प्लास्टिक पिशवी घेऊन जाताना दिसतात. त्यामुळे प्लास्टिकबंदीची कारवाई थंडावली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
आजही हॉटेल्स, कटलरी दुकाने, भाजीविक्रेते, पथारीवाले, वडापाव, चहाच्या गाड्यांवर प्लास्टिकच्या पिशव्यातून सर्रास पार्सल दिले जाते. केंद्र सरकारने 1 जुलै 2022 पासून ‘सिंगल यूज प्लास्टिक आयटम’ वापरावर बंदी घातली. याशिवाय, सरकारने पॉलिथिन पिशव्यांची जाडी 50 मायक्रॉनवरून वाढवून 120 मायक्रॉन केली आहे.
अशा सिंगल यूज’ प्लॅस्टिक वस्तूंमध्ये प्लास्टिकच्या काड्या, फुग्यांसाठी प्लास्टिकच्या काड्या, झेंडे आणि कँडीसाठी प्लास्टिकच्या काड्या, आईस्क्रीमसाठीच्या काड्या, सजावटीसाठी पॉलिस्टीरिन थर्मोकॉल यांचा समावेश आहे. तसेच प्लेट्स, कप, ग्लासेस, कटलरी जसे काटे, चमचे, चाकू, ट्रे, स्वीट बॉक्स, आमंत्रण कार्ड आणि सिगारेटच्या पॅकेटवर प्लास्टिक रॅप आणि 100 मायक्रॉनपेक्षा कमी पीव्हीसी बॅनर यांचा समावेश आहे.
यामध्ये प्लास्टिक विक्री करणार्या दुकानदाराला 5 हजार व ग्राहकाला 500 रुपये दंडाची तरतूद आहे. तसेच विक्रेता दुसर्यांदा प्लास्टिकची विक्री करताना आढळ्यास 25 हजार रुपये दंड आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल 2024 ते मार्च 2025 या कालावधीत पुढीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे.
प्लास्टिक जनजागृती मोहीम आरोग्य विभागातर्फे सुुरू आहे. त्यामुळे त्याकडे जास्त लक्ष आहे; मात्र प्लास्टिक वापरावर बंदी आहे. त्याबाबत प्रत्यक्ष पाहणी करून दंड वसूल केला जात आहे.
सचिन पवार (उपायुक्त, आरोग्य विभाग)
पालिकेकडून प्लास्टिक बंदीची कारवाई होत नाही. वर्षभरात फक्त दोनशे कारवाया होतात. प्लास्टिक विक्री, खरेदी यांचे व्यवहार अगदी सुरळीत सुरू आहेत. बाराशे मेट्रिक टन कचर्यामध्ये चारशे मेट्रिक टन नुसते प्लास्टिक आहे. त्यावर पालिका महागडे प्रकल्प इंधननिर्मितीसाठी राबवित आहेत जे परवडतदेखील नाही. सिंगल युज प्लास्टिकवर बंदी असताना सर्रास वापर होत आहे.
प्रशांत राऊळ (पर्यावरण प्रेमी)