

पिंपरी: यंदाच्या गणेशोत्सवात मेट्रोतून प्रवास करण्यास विक्रमी प्रतिसाद लाभला. पिंपरी ते स्वारगेट मार्गावर मेट्रोतून प्रवास करीत नागरिकांनी मोठी गर्दी केली. गणेश चतुर्दशीच्या दिवशी पुण्यातील प्रसिद्ध विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी तब्बल 2 लाख 55 हजार 549 जणांनी मेट्रोतून प्रवास केला.
त्या दिवशी मेट्रो रात्रभर नागरिकांनी भरून धावत होती. गणेशोत्सवातील आठ दिवसांत तब्बल 15 लाख 20 हजार 431 जणांनी मेट्रोला पसंती दिली. त्यातून महामेट्रोला तब्बल 2 कोटी 43 लाख 65 हजार 14 रुपयांचे विक्रमी उत्पन्न मिळाले. (Latest Pimpri News)
गणेशोत्सव काळात
पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मोठ्या संख्येने पुण्यातील मानाचे गणपती दर्शनासाठी तसेच, आकर्षक देखावे पाहण्यासाठी आवर्जून जातात. त्या पार्श्वभूमीवर महामेट्रोने सकाळी सहा ते रात्री अकराची वेळ वाढवून रात्री दोनपर्यंत केली होती.
ती वाढीव वेळ सात दिवस होती. तर, अखेरच्या दिवशी मेट्रो रात्रभर सुरू ठेवण्यात आली होती. पिंपरी ते स्वारगेट मार्गामुळे थेट पुण्यातील मध्यवस्तीतील मानाच्या गपणतीपर्यंत सहज पोहचता येत असल्याने नागरिकांची सोय झाली. त्यामुळे नागरिकांनी मेट्रोला अधिक पसंती दिली.
पुण्यातील गणपती व देखावे पाहण्यासाठी नागरिक मेट्रोत गर्दी करत होते. गर्दी झाल्याने लोकल ट्रेनसारखी मेट्रोची अवस्था झाली होती. रात्री दोनपर्यंत मेट्रो ये-जा करत असल्याने नागरिकांच्या गर्दीमुळे रात्री अडीचपर्यंत मेट्रो स्टेशन परिसरात वर्दळ दिसून येत होती. गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी स्टेशनवर सुरक्षारक्षकांची संख्या वाढविण्यात आली होती. प्रवाशांना वारंवार सूचना देण्यात येत होत्या.
तिकीट काढण्याबाबत मदत केली जात होती. तसेच, सफाईसाठी स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पिंपरीहून स्वारगेटकडे जाणारी तसेच, तिकडून येणारी मेट्रो भरून धावत होती. गणेशोत्सवामुळे मेट्रोच्या प्रवाशांत दुप्पटीपेक्षा अधिक प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे यंदा गणपती बापा मेट्रोला पावला, असे सकारात्मक चित्र दिसून आले.
विसर्जनाच्या दिवशी 2 लाख 55 हजार 549 जणांचा प्रवास
अनंत चतुर्दशीच्या गणेश विसर्जनाच्या दिवशी शनिवारी रात्रभर मेट्रो सुरू होती. नागरिकांनी मेट्रोतून प्रवास करीत पुण्यातील विसर्जन मिरवणुकीचा आनंद लुटला. त्यामुळे रात्रीपासून पहाटेपर्यंत मेट्रोत गर्दी होती. त्या दिवशी सर्वाधिक तब्बल 2 लाख 55 हजार 549 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. त्यातून महामेट्रोला 37 लाख 35 हजार 726 रुपयांचे उत्पन्न तिजोरीत जमा झाले.
नवव्या दिवशी सर्वाधिक 37 लाख 35 हजारांचे उत्पन्न
पिंपरी ते स्वारगेट मार्गावर गणेशोत्सवातील नवव्या दिवशी (दि.4) सर्वाधिक 37 लाख 35 हजार 726 रूपयांचे उत्पन्न तिकीट विक्रीतून महामेट्रोला मिळाले. त्या दिवशी 2 लाख 6 हजार 963 जणांनी मेट्रोतून प्रवास केला. तर, श्री विसर्जनाच्या दिवशी सर्वाधिक 2 लाख 55 हजार 549 जणांनी मेट्रोतून दिवस-रात्र प्रवास केला. त्या दिवशी मेट्रोच्या तिजोरीत 32 लाख 4 हजार 6 रुपये जमा झाले.