

वडगाव मावळ: शासनाच्या नगरविकास विभागाच्या निर्णयानुसार वडगाव नगरपंचायत हद्दीतील थकीत मिळकतधारकांची मालमत्ता करावरील शास्ती (दंड) अंशतः माफ करण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अभय योजनेला 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाद देण्यात आली आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेऊन मालमत्ता कर भरावा, असे आवाहन मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम यांनी केले आहे.
महाराष्ट्र शासनाने 19 मे 2025 पर्यंतच्या मालमत्ता करावरील शास्ती (दंडात्मक व्याज) माफीसाठी अभय योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या थकबाकीदार मिळकतधारकांची शास्ती (दंडात्मक व्याज) ची थकबाकी आहे, असे मिळकतधारकांनी महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती अधिनियम 1965 चे कलम 150 (क) नुसार नगरपरिषद मालमत्ता करावरील शास्ती अंशतः किंवा पूर्णतः माफ करण्यासाठी शास्ती वगळून मिळकतकराची पूर्ण रक्कम भरून विहीत नमुन्यात अर्ज नगरपंचायत कार्यालयाकडे सादर करावा, असे आवाहन मुख्याधिकारी निकम यांनी केले आहे. (Latest Pimpri News)
या योजनेचा लाभ घेण्यासाठी 15 ऑगस्ट 2025 पर्यंत अर्ज करण्याची अखेरची मुदत होती. त्यानंतरही ही योजना चालू ठेवण्यात आली असून, आता पुन्हा 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
ही योजना थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी प्रोत्साहनपर योजना आहे. जे मिळकतधारक या योजनेचा अभय योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्या मालमत्ताधारकांनी सवलत मागणीकरता परिपूर्ण प्रस्ताव नगरपंचायत कार्यालयात सादर करावेत. जास्तीत जास्त करदात्यांनी आपल्या मालमत्तेची 2025-26 पर्यंतची कर मागणीची रक्कम, शास्तीची (दंडात्मक व्याजाची) रक्कम वगळून भरणा करून सदर लोकहित योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.