

संतोष शिंदे
पिंपरी: 'तुमचे सिम कार्ड बंद होणार आहे', 'केवायसी अपडेट करा', 'नेटवर्क व्हेरिफिकेशनसाठी *# कोड डायल करा', अशा प्रकारचे फोन किंवा संदेश आल्यास सावध राहण्याचे आवाहन पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी केले आहे. सायबर गुन्हेगार आता कॉल फॉरवर्डिंग (Call Forwarding) या सुविधेचा गैरवापर करून नागरिकांच्या मोबाईलवरील महत्त्वाचे कॉल स्वतःच्या मोबाईलवर वळवत आर्थिक फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे.
सायबर गुन्हेगार स्वतःला मोबाईल कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगतात. त्यानंतर सिम कार्ड बंद होणार, केवायसी अपूर्ण आहे, नेटवर्क अपडेट करावे लागेल किंवा व्हेरिफिकेशन आवश्यक आहे, अशी भीती दाखवून नागरिकांना * किंवा # असलेला USSD कोड डायल करण्यास भाग पाडले जाते. हा कोड डायल होताच संबंधित मोबाईलवरील कॉल फॉरवर्डिंग सुविधा सुरू होते आणि नागरिकांना येणारे महत्त्वाचे कॉल थेट सायबर गुन्हेगारांकडे वळविले जातात. यानंतर बँक, यूपीआय, क्रेडिट कार्ड तसेच इतर आर्थिक व्यवहारांशी संबंधित व्हेरिफिकेशन कॉल किंवा ओटीपी कॉल गुन्हेगारांकडे पोहोचतात. या माहितीचा गैरवापर करून ते बँक खात्यातील रक्कम लंपास करतात.
अनेकदा नागरिकांना नेटवर्कमध्ये बिघाड झाला आहे, असे वाटते. प्रत्यक्षात मात्र त्यांचे सर्व महत्त्वाचे कॉल दुसऱ्याच क्रमांकावर वळविलेले असतात. पीडिताच्या नावाने नातेवाईक, मित्र किंवा व्यावसायिक संपर्कांशी संवाद साधून आणखी फसवणूक करण्याचाही प्रयत्न केला जातो. त्यामुळे आर्थिक नुकसानीबरोबरच वैयक्तिक माहिती आणि गोपनीयताही धोक्यात येते. सायबर पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून * किंवा # असलेले कोड डायल न करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुरू असल्याची शंका आल्यास तातडीने त्याची पडताळणी करून ती सुविधा बंद करावी. तसेच फसवणुकीचा संशय आल्यास बँकेशी संपर्क साधून खाते सुरक्षित करावे आणि त्वरित सायबर हेल्पलाईनवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
कॉल फॉरवर्डिंगचे नुकसान
कॉल फॉरवर्डिंग सुरू झाल्यानंतर बँकेचे व्हेरिफिकेशन कॉल, यूपीआय पडताळणी, क्रेडिट कार्ड व्यवहारांची पुष्टी, नोकरीसंदर्भातील कॉल, व्यावसायिक कॉल तसेच इतर महत्त्वाचे फोन नागरिकांऐवजी सायबर गुन्हेगारांकडे पोहोचू शकतात. त्यामुळे आर्थिक व्यवहारांसह वैयक्तिक माहितीही धोक्यात येण्याची शक्यता वाढते.
हे कोड प्रत्येक मोबाईलधारकाने लक्षात ठेवा
मोबाईलमध्ये कॉल फॉरवर्डिंग सुरू आहे की नाही, हे तपासण्यासाठी *#21# डायल करा. कॉल फॉरवर्डिंग सुरू असल्याचे दिसल्यास ##002# डायल करून ती सेवा तात्काळ बंद करता येते.
घाईगडबडीत निर्णय अंगाशी
मोबाईल सेवा कंपनीचा अधिकारी असल्याचे सांगून विश्वास संपादन केला जातो. त्यानंतर सिम बंद होणार, केवायसी अपडेट करावी लागेल किंवा नेटवर्क पडताळणी सुरू असल्याचे सांगून घाईगडबडीत निर्णय घेण्यास भाग पाडले जाते. नागरिकांनी घाबरून संबंधित कोड डायल करताच कॉल फॉरवर्डिंग सक्रिय होते आणि फसवणुकीला सुरुवात होते.
फसवणूक झाल्यास काय कराल?
मोबाईल सेवा कंपनीशी संपर्क साधून कॉल फॉरवर्डिंग बंद असल्याची खात्री करा. संबंधित बँकेला तातडीने माहिती देऊन खाते सुरक्षित करा. त्यानंतर www.cybercrime.gov.in या पोर्टलवर अथवा १९३० आणि १९४५ या हेल्पलाईनवर तक्रार नोंदवा. जितक्या लवकर तक्रार नोंदविली जाईल, तितकी रक्कम गोठविण्याची शक्यता वाढते.
कॉल फॉरवर्डिंगच्या माध्यमातून होणाऱ्या सायबर फसवणुकीपासून बचावासाठी नागरिकांनी अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणताही USSD कोड डायल करू नये. संशयास्पद कॉल किंवा फसवणुकीचा प्रकार निदर्शनास आल्यास तातडीने १९३० या हेल्पलाईनवर अथवा राष्ट्रीय सायबर गुन्हे पोर्टलवर तक्रार नोंदवावी. नागरिकांची सतर्कताच अशा गुन्ह्यांवरील प्रभावी प्रतिबंध आहे.
रविकिरण नाळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस ठाणे, पिंपरी-चिंचवड.