

पिंपरी: यंदा अकरा दिवसांचा पाहुणचार घेऊन सर्वांचा लाडक्या बाप्पा शनिवार (दि. 6) अनंत चतुर्दशीदिनी परतीच्या प्रवासाला निघणार आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील गणेश मंडळांनी गणरायाला निरोप देण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. आकर्षक रथातून बाप्पाची मिरवणूक काढण्यात येणार आहे. शहरवासीयांनाही विसर्जन मिरवणूक पाहण्याची उत्सुकता लागली आहे.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची मिरवणुकीची, ढोल-ताशा पथक, झांज पथकांचीही तयारी झाली आहे. घरगुती गणपतींचेदेखील विसर्जन केले जाते. त्यामुळे अनेक ठिकाणी शुक्रवार (दि. 5) सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. गेले अकरा दिवस शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. (Latest Pimpri News)
चिंचवड आणि पिंपरी येथील गणेश मंडळांच्या विसर्जन मिरणुकीसाठी पालिकेतर्फे मंडप आणि स्टेज बांधण्यात आले आहे. तसेच घाटांची स्वच्छता, निर्माल्य कुंड अशी व्यवस्था करण्यात आली आहे. पालिकेचे अग्नीशमन दलही सज्ज ठेवण्यात आले आहे. कोणतीही दुर्घटना घडू नये, म्हणून कर्मचारी आणि अधिकारी लक्ष ठेवून आहेत.
विसर्जन मिरवणूक रथ
गणेश मंडळांचे कार्यकर्ते विसर्जन मिरवणुकीचा रथ बनवण्यात व्यस्त होते. बहुतांश सार्वजनिक गणेश मंडळात श्री सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. विसर्जन मार्गात अडथळा ठरणार्या झाडाच्या फांद्या पालिकेच्या वतीने तोडण्यात आल्या. गणेश मंडळांकडून तुळजा भवानी रथ, स्वामी समर्थ रथ तर काहींनी राधा-कृष्ण, फुलांची आकर्षक सजावट केलेले मोठ्या आकाराचे हंस अशा वेगवेगळ्या कल्पना राबवून रथांची सजावट केली आहे. मंडळांकडून 15 ते 15 फुटांचे मिरवणूक रथ तयार करण्यात आले आहे.
ढोल-ताशा, झांज पथक सज्ज
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये मुख्य आकर्षण असते ते ढोल-ताशा पथकांचे. पाच ते सहा तास चालणार्या विसर्जन मिरवणुकांमध्ये ढोल ताशा पथक भाविकांचा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवित असतात. त्यामुळे प्रत्येक गणेश मंडळाने ढोल-ताशा पथकांना आमंत्रित केले आहे. मिरवणुकीच्या आणी ढोल-ताशा पथकांचे सादरीकरण असते. यामध्ये महिलांचे ढोल-ताशा पथक, शालेय विद्यार्थ्यांचे ढोल ताशा पथक यांना आमंत्रित केले आहे.
विसर्जन घाट
घाटावर विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आली आहे; तसेच घाटावर साफसफाई करण्यात आली आहे. मूर्ती संकलन करण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी तैनात आहे. घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे व विद्युत दिव्यांची व्यवस्था आहे. संकलन केलेल्या मूर्ती ठेवण्यासाठी मंडप उभारण्यात आला आहे. मूर्ती संकलनासाठी व वाहतुकीसाठी टेम्पोची व्यवस्था करण्यात आली आहे. घाटावर निर्माल्य जमा करण्यासाठी निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहे.