

पिंपरी: शहरात गेल्या अकरा दिवसांपासून भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाचा उत्सव सुरू आहे. शनिवार (दि. 6) लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पिंपरी-चिंचवड पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे.
शहरातील विविध घाटांवर अधिकारी आणि कर्मचार्यांसह सुमारे चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे. विसर्जन मिरवणुकांमध्ये शिस्त अबाधित राहावी, यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडून घाटांची पाहणी पूर्ण झाली असून मिरवणुकांवर थेट लक्ष ठेवले जाणार आहे. (Latest Pimpri News)
पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी नागरिक व मंडळांच्या कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करण्याचे आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. उत्सव साजरा करा, पण नियम पाळा, असे आवाहन त्यांनी ‘पुढारी’च्या माध्यमातून केले आहे.
विसर्जन सोहळ्याचा आढावा
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हद्दीत एकूण 2,146 गणेशोत्सव मंडळे नोंदणीकृत आहेत. त्यापैकी पाचव्या आणि सातव्या दिवशी मोठ्या संख्येने विसर्जन झाले. नवव्या दिवशी 236, दहाव्या दिवशी 373, तर अकराव्या दिवशी तब्बल 959 मंडळांचे विसर्जन होणार आहे. सांगवी परिसरातील बहुतांशी मंडळांचे सातव्या दिवशी विसर्जन झाले असल्याने अंतिम दिवशी प्रामुख्याने पिंपरी, चिंचवड आणि निगडी भागातील घाटांवर मोठी गर्दी होणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना
महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक घाटावर महिला पोलिस पथक तैनात असून, साध्या वेशातील महिला अधिकारी गस्त घालणार आहेत. महिलांच्या टीम्स सतत कार्यरत राहतील. ज्यामुळे छेडछाड अथवा असभ्य वर्तनावर त्वरित कारवाई होणार आहे. महिलांसाठी तक्रार बूथ सुरू करण्यात आले आहेत.
धार्मिकस्थळांवर विशेष लक्ष
विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर असलेल्या प्रमुख धार्मिक स्थळांवर पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. मंदिर, मशीद, दरगाह, मठ या परिसरांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे.
मिरवणुकीदरम्यान कोणताही वाद निर्माण होऊ नये, म्हणून संवेदनशील ठिकाणी पोलिस अधिकारी स्वतः हजर राहून पाहणी करत, गर्दीतील संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी साध्या पोशाखातील पोलिस तैनात ठेवले आहेत. धार्मिक सौहार्द अबाधित राहावा, नागरिकांनी शांततेत उत्सव साजरा करावा, यासाठी पोलिसांकडून आवाहन करण्यात आले आहे.
ड्रोन, सीसीटीव्हीद्वारे निरीक्षण
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंदा पोलिसांनी तांत्रिक साधनांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला आहे. विसर्जन मिरवणुकीच्या मार्गांवर आणि घाटांवर उभारलेल्या सीसीटीव्ही कॅमेर्यांमधून थेट नियंत्रण कक्षातून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
शिवाय ड्रोन कॅमेर्यांचा वापर करून मिरवणुकीची हालचाल आणि गर्दीचे प्रमाण तपासले जाणार आहे. संशयास्पद हालचाली अथवा आपत्कालीन परिस्थिती लगेच नियंत्रण कक्षाला कळवले जाते. त्यामुळे पोलिसांना तत्काळ कारवाई करणे शक्य होणार आहे.
सायबर विभागही अलर्ट मोडवर
सायबर सेलमार्फत सोशल मीडियावरील अफवा आणि आक्षेपार्ह संदेशांवर लक्ष ठेवले जात आहे. अग्निशमन विभागाची तातडीची साधनेदेखील सज्ज आहेत, तर वैद्यकीय पथक व अॅम्ब्युलन्सदेखील तैनात करण्यात आली आहेत. चोख पोलिस बंदोबस्त
विसर्जन घाटांवर आणि मिरवणूक मार्गांवर तब्बल चार हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात पोलिस सहआयुक्त, अपर पोलिस आयुक्त, 6 उपायुक्त, 9 सहायक आयुक्त, 64 निरीक्षक, 291 उपनिरीक्षक, 2 हजार 355 पोलिस अंमलदार, 400 होमगार्ड, 2 एसआरपीएफ प्लाटून, 17 स्ट्रायकिंग फोर्स, 6 आरसीपी प्लाटून आणि 1 बीडीडीएस पथक यांचा समावेश आहे. ठिकठिकाणी टेहळणीसाठी टॉवर उभारण्यात आले असून गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. विसर्जना वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अतिरिक्त होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे.
73 महत्त्वाचे विसर्जन
घाट पोलिसांच्या दृष्टीने शहरातील तब्बल 73 विसर्जन घाट महत्त्वाचे मानले गेले आहेत. यातील काही घाटांवर पाचव्या, सातव्या आणि नवव्या दिवशी मोठ्या प्रमाणात विसर्जन पार पडले आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशीदेखील या घाटांवर हजारो गणेशमूर्तींचे विसर्जन होणार असून गर्दीचा मोठा ओघ अपेक्षित आहे. त्यामुळे पोलिसांनी या सर्व घाटांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे.
वाहतुकीत बदल
विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये, म्हणून शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक पोलिस तैनात आहेत. त्यांच्या मदतीसाठी अतिरिक्त अधिकारी आणि शंभर होमगार्ड यांचे मनुष्यबळ देण्यात आले आहे. विसर्जनाच्या दिवशी नागरिकांना त्रास होऊ नये, म्हणून पिंपरी-चिंचवडसह 39 मिरवणूक मार्गांवरील वाहतूक वळवण्यात आली आहे.
बाप्पाला निरोप देण्यासाठी तसेच शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळण्यासाठी पोलिस यंत्रणा 24 तास रस्त्यावर आहे. अनुचित प्रकार आढळल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्या. नियमभंग केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे.
- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड.