

पिंपरी: येत्या शनिवारी गणरायाचे विसर्जन होणार आहे. त्यामुळे गणरायाचे जसे थाटात स्वागत करण्यात आले, त्याचप्रमाणे गणरायाला निरोप देतानादेखील उत्साहात निरोप देण्याची तयारी सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांचे विसर्जन मिरवणुकीसाठी रथ सजावटीचे काम सुरू आहे.
कार्यकर्त्यांची अहोरात्र मेहनत
पिंपरी-चिंचवड शहरातील मंडळांनी ढोल-ताशांचा गजरात, फुलांची उधळण करत, तर काहींनी आकर्षक फुलांच्या रथातून गणरायाची मंडळामध्ये विधीवत प्राणप्रतिष्ठा केली. दरवर्षी मंडळांकडून गणरायाच्या स्वागताची आणि विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केली असते. महिनाभरापासून राबणार्या कार्यकर्त्यांमध्ये अजूनही कमालीचा उत्साह आहे. दहा दिवस न थकता गणरायाची सेवा करून आता निरोपाची तयारी कार्यकर्ते करत आहेत. (Latest Pimpri News)
फुलांचे आकर्षक रथ
वेगवेगळ्या देवदेवतांचा, तर कोणी फुलांच्या आकर्षक रथातून गणरायाची मिरवणूक काढणार आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये रथ हा भाविकांच्या आकर्षणाचा विषय असतो. त्यामुळे रथ सजविण्यासाठीदेखील मंडळामध्ये चढाओढ लागली आहे. रथामध्ये देवतांच्या मूर्ती, विद्युत रोषणाई आदी कामे सुरू आहेत. शहरातील मुख्य गणेश मंडळाच्या परिसरात हे विसर्जन मिरवणुकीचे रथाचे काम सुरू असलेले दिसत आहे. विसर्जनाच्या दिवशी संपूर्ण तयारीनिशी सजविलेल्या रथातून मिरवणूक काढण्यात येणार आहे.