Lonavala Municipal Protest: लोणावळ्यात नगरपरिषद वादावर पडदा; कार्यालयाचे कुलूप काढले

लोकप्रतिनिधी व मुख्याधिकाऱ्यांची बैठक; विकासकामांसाठी समन्वयावर सहमती
Lonavala Nagar Parishad
Lonavala Nagar ParishadPudhari
Published on
Updated on

लोणावळा: नगर परिषदेमधील सत्ताधारी पक्षाचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी 20 मार्च रोजी लोणावळा नगर परिषदेमधील मुख्याधिकारी यांच्या कार्यालयाला कुलूप लावत त्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध नोंदवला होता. तर, मुख्याधिकारी यांनी माझ्याकडे कोणतीही फाईल प्रलंबित नसल्याचे सांगत कामाच्या बाबतीमध्ये चोख असल्याचे म्हटले होते. शासकीय कार्यालयाला कुलूप लावण्याची लोकप्रतिनिधींची ही कृती कायदा व्यवस्थेला धरून नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार विक्रम देशमुख यांनी पोलिस बंदोबस्तामध्ये कार्यालयाला लावण्यात आलेले कुलूप काढले आहे.

Lonavala Nagar Parishad
PMPML Seven Pay Commission: पिंपरीत पीएमपीएमल कर्मचाऱ्यांना 56 कोटी मंजूर; स्थायी समितीचा निर्णय

लोकप्रतिनिधींना अधिक वेळ देणार: मुख्याधिकारी

आमदार सुनील शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 27 मार्च रोजी लोणावळा नगर परिषदेमधील नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व नगरसेवक तसेच मावळचे प्रांत अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी यांच्या भावना व मुख्याधिकारी यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर मुख्याधिकारी यांनी शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी व विकासकामांना अधिकचा वेळ देण्याचे मान्य केले आहे. तसेच, त्यांनी त्याबाबतची सकारात्मकता दाखवल्यानंतर सर्व लोकप्रतिनिधींनी त्यांचा मुख्याधिकारी म्हणून स्वीकार केला.

Lonavala Nagar Parishad
Pimpri Chinchwad Snake Sightings: पिंपरी-चिंचवडमध्ये सापांचे दर्शन वाढले; मिलन हंगामामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सुधारणा न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा

मुख्याधिकारी यांनी त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमध्ये बदल करावा व अधिकचा वेळ शहराच्या विकासासाठी द्यावा, जास्तीत जास्त वेळ त्यांनी कार्यालयामध्ये उपस्थित राहावे, अशा स्वरूपाच्या अपेक्षा सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केल्या आहेत. पुढील काही दिवसांमध्ये यात सुधारणा न झाल्यास आंदोलन पुन्हा एकदा उभे केले जाईल. तूर्तास ते स्थगित केले असले तरी थांबलेले नाही, असेदेखील लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. 26 मार्च रोजी सायंकाळी तहसीलदार यांच्या उपस्थितीमध्ये मुख्याधिकारी कार्यालयाचे कुलूप खोलण्यात आले. पदाचा गैरवापर करत लोकप्रतिनिधींनी केलेली कृती ही कायदेशीरदृष्ट्या चुकीची असल्यामुळे लोकप्रतिनिधींवर कायदेशीर कारवाईदेखील होऊ शकते, अशा चर्चा लोणावळा शहरामध्ये सुरू होत्या. 27 मार्च रोजी आमदार सुनील शेळके यांनी मुख्याधिकारी व लोकप्रतिनिधी यांची एकत्रित बैठक घेत सर्वांना सूचना दिल्या आहेत. विकासकामे करत असताना शासन व प्रशासन यांनी एकत्रित येऊन काम केले तरच खऱ्या अर्थाने विकास होऊ शकतो, असे त्यांनी सांगितले.

Lonavala Nagar Parishad
Pune Metro Line 3 Launch: पुणे मेट्रो लाईन 3 अंतिम चाचणी पूर्ण; मे 2026 पर्यंत हिंजवडी-शिवाजीनगर मार्ग सुरू होणार

कार्यालयाला कुलूप लावणे हा आंदोलनाचा भाग

नगरसेवक निखिल कवीश्वर म्हणाले, की मर्जीतला मुख्याधिकारी आणण्यासाठी कार्यालयाला कुलूप लावले होते. याबाबत सुरू असलेल्या चर्चेमध्ये कोणतेही तथ्य नाही. कार्यालयाला कुलूप लावणे हा आमच्या आंदोलनाचा एक भाग होता. तर, मुख्याधिकारी जनतेला वेळ देत नसल्यामुळे हे आंदोलन करण्याची वेळ आली. आंदोलन हे केवळ जनतेच्या विकासांना प्राधान्य देण्याच्याच मुद्द्यावर करण्यात आले होते. आंदोलनाबाबतच्या वेगवेगळ्या चर्चा लोणावळा शहरामध्ये सुरू आहेत. मुख्याधिकारी बदलण्याचे कोणतेही अधिकार हे नगरसेवकांना नाहीत, तसे असते तर सभागृहात ठराव घेऊन आम्ही मुख्याधिकारी बदलू शकलो असतो. तसेच, हे आंदोलन केल्यामुळे लोकप्रतिनिधींचे पद जाऊ शकतात. याबाबतदेखील जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत, त्यातदेखील कोणतेही तथ्य नाही.

Lonavala Nagar Parishad
Pimpri Chinchwad Metro Extension Cost: पिंपरी-निगडी मेट्रो विस्ताराचा खर्च वाढला; टिळक चौक स्टेशनमुळे महापालिकेवर अतिरिक्त भार

बैठकीमध्ये आमदार सुनील शेळके व प्रांत अधिकारी यांनी मुख्याधिकारी यांना सूचना दिल्या असून, लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन जनतेच्या विकासाची कामे करा, असे सांगितले आहे. मुख्याधिकारी यांनी या बाबतीमध्ये सकारात्मक राहण्याचे सांगितल्यानंतर आमचे मनोमिलन झाले आहे.

राजेंद्र सोनवणे, नगराध्यक्ष

मुख्याधिकाऱ्यांबाबतच्या सर्व तक्रारी आम्ही आमदार व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर मांडल्या आहेत. मुख्याधिकारी यांनी त्या कबूलदेखील केल्या आहेत. यापुढील काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचे मान्य केल्यामुळे आंदोलन थांबवण्यात आले आहे.

देविदास कडू, उपनगराध्यक्ष

मुख्याधिकारी यांनी नागरिक, लोकप्रतिनिधी व विकासकामांना प्राधान्य दिले पाहिजे. कामाच्या ठिकाणी स्वतः मुख्याधिकारी यांनी पाहणी करणे गरजेचे आहे. या सर्व गोष्टी लोकप्रतिनिधींनी आमदार व वरिष्ठ अधिकारी यांच्यासमोर मांडल्या आहेत. मुख्याधिकारी यांनीदेखील शासकीय बैठक व कामकाजामुळे नगर परिषदेत जास्त वेळ देता येत नसल्याचे कबूल केले आहे. मुख्याधिकारी यांच्यासोबत आमचे कोणतेही मनभेद नाहीत, मतभेद निश्चित होते. मात्र, तेसुद्धा नागरिकांच्या विकासाच्या मुद्द्यावर होते.

धनंजय काळोखे, सभापती, आरोग्य समिती

जनतेच्या सेवेसाठी, विकासासाठी आमची पदे गेली तरी हरकत नाहीत, आम्ही त्यालादेखील सामोरे जायला तयार आहोत. मुख्याधिकारी यांनी लोणावळा शहरातील नागरिकांना व येथील प्रश्नांना अधिकचा वेळ देण्याचे मान्य केल्यामुळे तूर्तास आंदोलन थांबले आहे; परंतु कार्यपद्धतीत बदल न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.

निखिल कवीश्वर, नगरसेवक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news