Pimpri Chinchwad Water Wastage: पिंपरी-चिंचवडमध्ये पाण्याची नासाडी सुरूच; एक दिवसाआड पुरवठ्यातही असमानता

कारवाईचा अभाव, 35 टक्के गळती; काही भागांना 24 तास पाणी, तर इतरांना टंचाई
Water Supply
Water SupplyPudhari
Published on
Updated on

मिलिंद कांबळे

पिंपरी: पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. असे असले तरी, दोन दिवसांचे पाणी एका दिवसात सोडले जाते. पाणी आल्यानंतर अंगण, पार्किंग, जीने तसेच, वाहने धुणे असे प्रकार नागरिकांकडून सर्रासपणे केले जातात. इमारती, बंगले व घरावरील पाण्याच्या टाक्या भरून वाहतात. अशा प्रकारे पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. तसा काही नियम नसल्याचे सांगत पाणीपुरवठा विभागाकडून हात झटकले जात आहेत. परिणामी, ऐन उन्हाळ्यातही पाण्याच्या नासाडीचे प्रमाण काही कमी होत नसल्याने काही भागांस पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Water Supply
Pimpri Accepted Corporators Election Delay: पिंपरीत स्वीकृत नगरसेवक निवड पुन्हा लांबणीवर; भाजपमधील मतभेद ठरले अडथळा

महापालिकेकडून शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज 670 एमएलडी पाणी शहराच्या अर्धा भागात दिले जाते. ते पाणी दोन दिवस पुरेल इतके असते. काही भागांत दोन तास तर, काही भागात 4 ते 5 तास पाणी सोडले जाते. त्या पाण्याची नागरिक घरातील टाक्यात साठवून करून ठेवतात. पाणी आल्यानंतर अंगण, पार्किंग, जिने तसेच, रस्ते धुण्याचे प्रकार सर्रासपणे केले जातात. तसेच, अनेकजण आपली वाहनेही धुतात. ते पिण्याचे पाणी कुंड्या, झाडे व बागेस दिले जाते. तसेच, इमारत, बंगले व घराच्या गच्चीवरील तसेच, जमिनीतील टाक्या पाण्याने भरून वाहतात. अनेकांचे नळ व नळजोड नादुरुस्त असल्याने मोठ्या प्रमाणात गळती होते. अनेक दुकानदार, व्यापारी व विक्रेते पिण्याचे पाण्याचा वापर करतात. या सर्व कारणाने दररोज मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची नासाडी होते. पाण्याची नासाडी करणाऱ्यांवर महापालिकडून कारवाई केली जात नाही. त्याबाबत विचारले असता, तसा कोणताही महापालिकेचा नियम नाही. विचारणा केल्यास आम्ही बिल भरतो, असा दम नागरिकांकडून दिला जात असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगितले जात आहे.

Water Supply
Pimpri Red Zone Property Sale Permission: शासनाच्या परिपत्रकाने संभ्रम दूर; अडकलेले व्यवहार मार्गी, नोंदणी प्रक्रिया सुलभ

या प्रकारे होते पाण्याची नासाडी

  • सार्वजनिक नळांना तोट्या नसणे

  • इमारत, सोसायटी, बंगल्यावरील पाण्याची टाकी भरून वाहने

  • घरातील नळ तोट्या, नळवाहिन्या नादुरुस्त

  • शिळे पाणी म्हणून ओतून देणे

  • रस्ते, अंगण, पार्किंग, जीने धुवून घेणे

  • दुचाकी, तीन चाकी, चार चाकी गाड्या धुणे

  • झाडे, कुंड्या, बागेत पाणी देणे

  • नादुरुस्त व्हॉल्व्हमधून पाणी गळती

  • दुकानदार, विक्रेत्यांकडून पाण्याचा वापर प्राधिकरण

निगडीत 24 तास पाणी; इतरांना दोन दिवसांतूनही पुरेसे पाणी नाही

संपूर्ण शहराला गेल्या साडेसहा वर्षांपासून दोन दिवसांपासून एकदा पाणीपुरवठा केला जातो. त्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने समन्यायिक पद्धतीने पाणीपुरवठा असे नाव दिले आहे. संपूर्ण शहराला दोन दिवसांतून एकदा पाणी देत असताना प्राधिकरण, निगडी या उच्चभ्रू परिसराला दररोज 24 तास पाणीपुरवठा केला जात आहे. त्या भागास सर्व शहराप्रमाणे पाण्याचा एकच दर आहे. ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई असतानाही त्या भागास 24 तास पाणी दिले जात आहे. त्यामुळे तो भाग महापालिकेसाठी खास आणि विशेष आहे का, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका प्रशासनाच्या या दुट्टपी भूमिकेबाबत रोष व्यक्त करण्यात येत आहे. त्या भागासही संपूर्ण शहराप्रमाणे दोन दिवसांतून एकदाच पाणी दिले जावे, अशी मागणी शहवासीयांकडून केली जात आहे.

Water Supply
Pimpri RTO NH Series Fancy Number: पिंपरी आरटीओत दुचाकींसाठी ‘एनएच’ नवी मालिका; आकर्षक क्रमांकासाठी अर्जाची संधी

पाण्याची 35 टक्के गळती होत असल्याचा दावा

महापालिकेकडून केल्या जाणाऱ्या पाण्यापैकी तब्बल 35 टक्के पाण्याची गळती होते, असा दावा पाणीपुरवठा विभागाकडून केला जात आहे. ती गळती म्हणजे बेहिशेबी पाणी होय. अनधिकृत नळजोड, व्हॉल्व्हमधून गळती, खासगी टँकरकडून बेकायदा वापर, पाणीचोरी आदी प्रकारामुळे ही गळती होत असल्याचे त्या विभागाकडून सांगितले जात आहे. परिणामी, पिण्याचे पाणी 100 टक्के अधिकृत नळजोड असलेल्या ग््रााहकांना मिळत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

बिल भरतो, मग का विचारता? असा उर्मट प्रतिप्रश्न

आम्ही पाण्याचे बिल भरतो. मग, पाणी कितीही वापरू, तुम्ही का विचारता, असा उर्मट प्रतिप्रश्न पाण्याची नासाडी करणाऱ्यांकडून केला जाता. तसेच, अशा लोकांवर कारवाई करण्याची कोणताही नियम नसल्याने महापालिका प्रशासनाला कारवाई करता येत नाही, असे पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Water Supply
Pimpri Auto Rickshaw Permit Issue: पिंपरीत परमिटपेक्षा जास्त रिक्षांची नोंदणी; वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर

प्रशासनाकडून जनजागृतीवर भर

उन्हाळा असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. पाणी वाढत नसून, उपलब्ध असलेल्या मर्यादित स्त्रोतातून पाणी संपूर्ण शहराला पुरवावे लागते. अशा परिस्थितीतही पाण्याची नासाडी करणाऱ्यावर कारवाई करता येत नाही. त्यासाठी महापालिकेकडून जनजागृती मोहिम हाती घेतली जाणार आहे. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन वेळोवेळी केले जात आहे. नळजोडास थेट विद्युत मोटार लावून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे, असे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांनी सांगितले.

थेट मोटार लावून पाणी खेचण्यावर कारवाई

नळजोडास थेट विद्युत मोटार लावून पाणी खेचणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाते. मोटारी जप्त केल्या जातात. क्षेत्रीय कार्यालयानिहाय पाणीपुरवठा पथकाकडून ही कारवाई केली जाते. विशेषत: उन्हाळ्यात ही कारवाई केली जाते. वर्षभरात एकूण 100 मोटारी जप्त करण्यात आल्या आहेत. महापालिकेकडून अनधिकृत नळजोड अधिकृत केले जात आहेत. त्या माध्यमातून पाण्याची चोरी थांबण्याचा प्रकारास आळा घातला जात आहे. शहरात 50 हजार अनधिकृत नळजोड असल्याचा अंदाज आहे. आत्तापर्यंत महापालिकेने 11 हजार 600 नळजोड अधिकृत केले आहेत. त्यांच्याकडून दंडासह रक्कमेची वसुली केली आहे. या कामासाठी नेमलेले एजन्सीवर पाणीपुरवठा विभागाने 32 कोटी रुपये खर्च केले आहेत. उर्वरित अनधिकृत नळजोड अधिकृत करण्याची कार्यवाही सुरू आहे. तसेच, महापालिकेचे पाणी वापरणाऱ्या वॉशिंग सेंटरवही कारवाई केली जात आहे, असे महापालिकेचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news