

उमेश सणस
पिंपळे गुरव: सुदर्शननगर, जवळकरनगर आणि वैदुवस्ती या भागात अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पाणीपुरवठा विभागाने सुदर्शननगर येथील सुदर्शन चौक ते जगताप पेट्रोलपंपदरम्यान नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेतले. हे काम आता अंतिम टप्प्यात आले असून, केवळ जोडण्या (कनेक्शन) देण्याचे काम बाकी आहे. मात्र, काम पूर्णत्वास जात असतानाच त्याच्या दर्जाबाबत नागरिकांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत.
पाईपलाईन टाकण्यासाठी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले होते. काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असतानाही संबंधित ठिकाणी योग्य प्रकारे भराव टाकून रस्ता पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे टाकण्यात आलेली खडी वाहनांच्या सततच्या वर्दळीमुळे संपूर्ण रस्त्यावर पसरत आहे. हा रस्ता मुळातच अरुंद असून, येथे दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. विखुरलेल्या खडीमुळे दुचाकीस्वारांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून घसरून अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे ज्या ठिकाणी पाईपलाईन टाकण्यात आली आहे. त्या भागातील काही पाईप रस्त्याच्या पातळीपेक्षा किंचित वर आलेले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. भविष्यात या मार्गावरून जड वाहने गेल्यास पाईपवर अतिरिक्त ताण येऊन ती निकामी होण्याची किंवा फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे झाल्यास पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी खर्च करण्यात आलेले लाखो रुपये वाया जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.
कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष
विशेष म्हणजे तळाच्या भागातील नागरिकांना मुबलक आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात आला. मात्र कामाच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष झाल्यास भविष्यात पुन्हा पाणीगळती, रस्ता खचणे आणि दुरुस्तीचा खर्च यासारख्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची तांत्रिक तपासणी करावी, पाईपलाईनची सुरक्षितता तपासावी आणि रस्त्यावर पसरलेली खडी तात्काळ हटवून रस्ता पूर्ववत करावा, अशी मागणी केली आहे.
नागरिकांच्या प्रमुख मागण्या
रस्त्यावर पसरलेली खडी तात्काळ हटवावी.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी.
पाईपलाईन योग्य खोलीवर बसविण्यात आली आहे का, याची खात्री करावी.
काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता तातडीने पूर्ववत करावा.
भविष्यात पाईप फुटणे किंवा पाणीगळती होणार नाही यासाठी दर्जेदार कामाची हमी द्यावी.
सुदर्शन नगर परिसरातील नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अद्याप संबंधित जोडणी (कनेक्शन) देणे बाकी आहे. सदर ठिकाणी भूमिगत विद्युत व इतर सेवा वाहिन्या असल्यामुळे नवीन पाईपलाईन आवश्यक खोलीपर्यंत टाकण्यात तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. तरी या ठिकाणाची पुन्हा पाहणी करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महेश बरिदे, कार्यकारी अभियंता, ड क्षेत्रीय कार्यालय, पाणीपुरवठा विभाग, मनपा
संबंधित अधिकाऱ्यांसमवेत प्रत्यक्ष कामाची पाहणी केली आहे. सध्या पाईपलाईन ज्या पद्धतीने टाकण्यात आली आहे, त्याबाबत काही तांत्रिक बाबींची पडताळणी करणे आवश्यक आहे. भविष्यात वाहनांच्या वर्दळीमुळे पाईपलाईनला नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासंदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाईपलाईन आणखीन अर्धा फूट खाली नेता येईल का, तसेच त्यासाठी कोणता तांत्रिक पर्याय उपलब्ध आहे याचा सविस्तर विचार करून योग्य निर्णय घेण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
शाम जगताप, नगरसेवक