

पिंपरी: महाराष्ट्र राज्यात एल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाल्याने पुढील वर्षभराचा विचार करता शहरात 31 ऑगस्ट 2027 पर्यंत दहा टक्के पाणीकपात सुरू ठेवण्याचे निर्देश खडकवासला पाटबंधारे विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेस दिले आहेत.
त्यामुळे तब्बल वर्षभर शहरवासीयांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. तसेच, पाण्याची नासाडी व अपव्यय टाळून बचतीला प्राधान्य द्यावे लागणार आहे.
शहराला सध्यस्थितीत पवना धरणातून 540 एमएलडी, आंद्रा धरणातून 95 एमएलडी आणि एमआयडीसीकडून 30 एमएलडी असा एकूण 665 एमएलडी पाणीपुरवठा दरररोज सुरू आहे. शहराला 25 नोव्हेंबर 2019 पासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.
राज्यात यंदा पावसाने मोठी ओढ दिल्याने दुष्काळाचे चित्र अधिक गडद झाले आहे. राज्यातील आणि पुणे जिल्ह्यात काही तालुक्यात सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. एल निनोच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागात पर्जन्यमानात मोठी घट झाली आहे.
पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर 31 ऑगस्ट 2027 पर्यंत दहा टक्के पाणीकपात कायम ठेवण्याचे निर्देश पाटबंधारे विभागाने महापालिकेस दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून पिंपरी-चिंचवड शहरात पूर्वीपासूनच अंमलबजावणी सुरू आहे.
मात्र, महापालिकेसाठी पवना आणि आंद्रा धरणातून सोडण्यात येणार्या पाण्यामध्ये कपात झाल्यास शहराला पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाण्याचा अपव्यय व नासाडी न करता पाण्याचा काटकसरीने वापर करण्यास प्राधान्य द्यावे, असे महापालिकेच्या अधिकार्यांचे मत आहे.
पुढील वर्षीपर्यंत पाणीकपात कायम राहणार
शहराला मागणीच्या तुलनेत कमी प्रमाणात पाणी मिळत आहे. सध्या सुरू असलेल्या दहा टक्के पाणीकपात पुढील वर्षी ऑगस्टपर्यंत कायम राहणार आहे. नागरिकांनी पाण्याची नासाडी तसेच, अपव्यय टाळावा. पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे सहशहर अभियंता अजय सूर्यवंशी यांनी सांगितले.