

पिंपरी : महापालिका निवडणुकीसाठी फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली येथील घरकुल वसाहतीमधील टाऊन हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली. मात्र, मतमोजणीच्या दिवशी पोलिस व निवडणूक प्रशासनातील समन्वयाच्या अभावामुळे मोठा गोंधळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
मतदान केंद्रापासून वाहनतळाची कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नसल्याने उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच समर्थकांना वाहने दूर अंतरावर उभी करावी लागली. त्यामुळे अनेकांना चालतच मतमोजणी केंद्रात यावे लागले. याबाबत उमेदवारांनी तीव नाराजी व्यक्त केली. सकाळी दहा वाजता केंद्राच्या प्रवेशद्वारावर पोहोचलेल्या उमेदवार व प्रतिनिधींना पोलिसांकडून प्रवेश नाकारण्यात आला. दहा वाजल्यानंतर प्रवेश नाही, अशी ताठर भूमिका घेतल्याने प्रवेशद्वारावर बाचाबाची झाली. अखेर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर संबंधितांना आत सोडण्यात आले.
मोबाईलला परवानगी नसल्याने अनेकांना पुन्हा वाहनांपर्यंत जाऊन मोबाईल ठेवण्यासाठी हेलपाटे मारावे लागले. स्पाईन रस्त्यालगतच्या सेवा रस्त्यावरील एकाच ठिकाणाहून प्रवेशाची परवानगी दिल्याने मुख्य रस्त्यापासून लांब अंतर चालावे लागले. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनाही पोलिसांनी अडवणूक केली. ओळखपत्र असूनही ’यादीत नाव नाही’ असे सांगून नाहक त्रास देण्यात आला. अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर माध्यम प्रतिनिधींना प्रवेश देण्यात आला.
दरम्यान, मतमोजणी प्रक्रियेला अडीच तास उशीर झाला. टपाली मतदानानंतर प्रभागनिहाय आकडे अत्यंत संथगतीने जाहीर करण्यात आले. संपूर्ण प्रकारामुळे मतमोजणी केंद्रातील अव्यवस्थापन व आदेशांबाबतचा संभम उघड झाला असून पोलिस व प्रशासनातील समन्वयाचा अभाव स्पष्टपणे समोर आला.
फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत चिखली येथील घरकुल वसाहतीमधील टाऊन हॉलमध्ये मतमोजणी प्रक्रिया सुरु असताना दुपारच्या वेळी उमेदवाराबरोबर असणारे कार्यकर्ते, मनपा कर्मचारी यांची उपासमार झाली. परिसरात कोणतीही खाण्यापिण्याची सोय नव्हती. प्रशासनाकडून चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती. बचतगटाकडून मागविण्यात आलेले जेवण पुरले नाही. कर्मचारी आणि कार्यकर्ते अर्धपोटीच राहिले. शेवटी चहा आणि बिस्किटावर दिवस काढण्यात आला.