

वर्षा कांबळे
पिंपरी: पिंपरी-चिंचवडमध्ये जानेवारी २०२६ ते आजतागायत २ हजार ५२८ क्षयरोग रुग्णांची नोंद झाली आहे. महापालिकेने २०२६ साठी ३ हजार १५० रुग्ण शोधण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यापैकी ८० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. यामध्ये शासकीय क्षेत्रातून १ हजार ६१४ तर खासगी क्षेत्रातून ९१४ रुग्णांची नोंद झाली आहे. आकडेवारीवरून शहरात अजूनही क्षयरोगाचा धोका कायम असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही वर्षांचा आढावा घेतल्यास २०२० मध्ये ३ हजार ६०० उद्दिष्टापैकी केवळ २ हजार ७१ रुग्ण सापडले होते. हे प्रमाण केवळ ५८ टक्के होते. कोरोना काळात तपासणी आणि सर्वेक्षणावर परिणाम झाल्याने रूग्ण शोधण्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यानंतर महापालिकेने घरोघरी सर्वेक्षण, मोफत तपासणी शिबिरे आणि जनजागृती मोहीम तीव्र केली. त्यामुळे २०२१ मध्ये २ हजार ५३० रुग्ण सापडले. २०२२ मध्ये २ हजार ९०२ रुग्ण सापडले. २०२३ मध्ये २ हजार ८९८ रुग्ण सापडले. २०२४ मध्ये ३ हजार ३७० रुग्ण सापडले. २०२५ मध्ये ३ हजार १७० रुग्णांची नोंद झाली.
पालिकेची ४६ डॉट सेंटर्स
क्षयरोगामध्ये निदान होऊन पूर्ण उपचार घेतला नाही तर तो १० ते १५ व्यक्तींना क्षयरोगबाधित करतो. महापालिकेच्या क्षयरोग नियंत्रण उपचार केंद्रात सध्या क्षयरोगाचे २५२८ रुग्ण उपचार घेत आहेत. शहरामध्ये महाालिकेची ४६ डॉट सेंटर आहेत. क्षयरोग पूर्णपणे बरा होण्यासाठी योग्य औषधे निश्चित मात्रामध्ये वेळेवर व पूर्ण कलावधीसाठी सहा ते आठ महिने घ्यावी लागतात. हा उपचार मध्येच बंद केल्यास औषधांचा परिणाम कमी होऊन औषधांना दाद न देणारा, अतिशय गंभीर असा एमडीआर टीबी होतो. अशा व्यक्तीकडून इतरांनाही संसर्ग होण्याचा धोका असतो.
पिंपरी-चिंचवड हाय बर्डन शहर
स्थलांतरित कामगार, दाट वस्ती आणि औद्योगिक परिसरामुळे पिंपरी-चिंचवड हे हाय बर्डन शहर आहे. कुपोषण, निकृष्ट आहार, अस्वच्छ परिसर, दाटीवाटीत असणार्या झोपड्या येथे गोरगरीब व सामान्य नागरिकांमध्ये आढळणारा क्षयरोग हल्ली हायफ्रोफाईल वस्तीमध्येदेखील वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये वाढत्या शहरीकरणामुळे बदलत्या जीवनशैलीमुळे उच्चभ्रू नागरिकांमध्येदेखील हा आजार पसरत आहे. महापालिकेच्या क्षयरोग उपचार केंद्रात वर्षाकाठी २ हजार क्षयरोगाचे रूग्ण उपचार घेत असतात.
निक्षय मित्र प्रणालीने क्षयरुग्णांचा शोध
बहुतांश वेळा परिस्थितीमुळे क्षयरूग्णास पूर्ण उपचार घेता येत नाही. किंवा स्थलांतरित झाल्यामुळे उपचारांमध्ये अडथळा येतो किंवा त्यांची नोंद राहत नाही. यासाठी केंद्र शासनाने क्षय रुग्णासाठी निक्षय मित्र पोषण योजना सुरु केली आहे. क्षयरोग हा एक गंभीर आजार आहे. परंतु काही लोकांकडे रोगांचा उपचार करण्यासाठी पैसे नसतात. अशावेळी आजाराच्या वेळी पौष्टिक आहारासाठी सरकार त्या लोकांना आर्थिक मदत करते या योजनांचा लाभ घेण्यासाठी रुग्णांची यावर नोंदणी केली जाते. ज्यामुळे राज्यात किंवा राज्याबाहेरही रुग्ण स्थलांतरित झाल्यास कोठेही उपचार आणि अर्थसहाय्य मिळते.
उच्चभ्रु लोकांमध्येही क्षयरोगाचे प्रमाण?
महापालिकेच्या सर्व क्षयरोग नियंत्रण उपचार केंद्रात उपचार घेणारे बिगारी, मोलमजुरी करणारे तर काही सर्वसामान्य घरातील रुग्ण आहेत. शहरामध्ये दिवसेंदिवस लोकवस्ती वाढत आहे. दाट लोकवस्तीमुळे संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच या नागरिकांचा आहार निकृष्ट दर्जाचा असल्यामुळे प्रतिकार शक्ती कमी होऊन अशा व्यक्तींना क्षयरोग होतो. तर आयटी व इतर हायप्रोफाईल नागरिकांमध्ये बदलत्या जीवनशैलीमध्ये आरोग्याची हेळसांड होते. कामामुळे फास्ट फूट व एनर्जी ड्रिंक म्हणून चहा, कॉफी व इतर पेयाचा आधार घेतला जातो. घरगुती जेवणातून जे पोषण मिळते ते मिळत नाही. त्यामध्ये अपुरी झोप व तणावग्रस्त जीवनशैली यामुळे क्षयरोग होतो असे वैद्यकीय तज्ज्ञाकडून सांगितले जाते.
महापालिकेच्या सर्व रुग्णालयात डॉट्स सेंटर आहेत. तसेच काही रुग्ण खासगी दवाखान्यात उपचार घेतात. त्यांची आकडेवारी समजण्यासाठी ९१८ डॉक्टरांचे रजिस्टे्रशन केले आहे. त्यांच्याकडून क्षयरुग्णांची माहिती घेतली जाते. त्याचे ऑनलाईन रेकॉर्ड ठेवले जाते. शासनातर्फे क्षयरुग्णांसाठी मोफत औषध आणि उपचार दिले जातात. क्षयरोगाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी प्रत्येकाने सामाजिक जबाबदारी म्हणून काम केले पाहिजे. शहरी भागामध्ये नागरिकांचे स्थलांतराचे प्रमाण जास्त असते त्यामुळे क्षयरोगाचे प्रमाण कमी जास्त होते.
डॉ. बाळासाहेब होडगर (शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी)