

पिंपरी: दिवाळीनिमित्त घरच्या फराळाचा गोडवा सातासमुद्रापार पोहोचवण्याची पोस्ट खात्याची परंपरा यंदाही कायम राहिली. शिक्षणासाठी जर्मनी आणि रशियामध्ये गेलेले विद्यार्थी, तर नोकरी व व्यवसायानिमित्त अमेरिका आणि जपानमध्ये स्थायिक झालेले नातेवाईक यांच्यासाठी अनेक कुटुंबांनी पोस्टाच्या माध्यमातून सुमारे चारशे किलो इतका घरगुती फराळ पाठवला.
चिवडा, लाडू, चकली, करंजी, शंकरपाळे अशा पदार्थांमधून घरची आठवण आणि दिवाळीचा आनंद परदेशात पोहोचवण्यात आला. त्याचबरोबर देशातील इतर राज्यांमध्येही आणि इतर जिल्ह्यांमध्येही पोस्ट सेवेमार्फत दिवाळी फराळ आणि भेटवस्तू पाठविण्यात आल्या.
पिंपरी कॉलनी पोस्ट विभागाकडून फराळाचे पार्सल पाठवण्यासाठी घरपोच संकलनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. विशेष म्हणजे, घरातून पार्सल घेण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारले नाही. त्यामुळे पोस्ट ऑफिसपर्यंत जाण्याची गरज न पडता नागरिकांना घरातूनच पार्सल पाठवण्याची सुविधा मिळाली. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि व्यस्त कुटुंबांना या सुविधेचा फायदा झाला.
परदेशात राहणाऱ्या मुलांना दिवाळीच्या सणाला घरी येणे शक्य होत नाही. अशा वेळी आईच्या हातचा फराळ त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पालकांकडून केला जातो. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर घरून आलेला फराळ ही केवळ खाद्यपदार्थांची भेट नसून कुटुंबाच्या प्रेमाची आणि आठवणींची जाणीव करून देणारा ठरतो. पोस्ट विभागाच्या पार्सल सेवेमुळे स्थानिक पातळीपासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भेटवस्तू आणि घरगुती पदार्थ पाठवण्याचा पर्याय नागरिकांना उपलब्ध होत आहे.
घरपोच पार्सल संकलनामुळे नागरिकांचा वेळ वाचला. योग्य पॅकिंग आणि सीमाशुल्कविषयक माहिती देऊन पार्सल पाठवण्याची प्रक्रिया सुलभ केल्यामुळे नागरिकांनी या वेळी पोस्ट सुविधेला नेहमीपेक्षा अधिक पसंती दिली.
संजय आढारी, उपडाकपाल (पिंपरी कॉलनी, उपडाकघर)